
no images were found
क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण शोध मोहीमेचा लाभ सर्वांनी घ्यावा- डॉ.दुर्गादास पांडे
कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत व कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत संयुक्त सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियानाचे उद्घाटन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे व मान्यवरांच्या हस्ते वाशी (ता. करवीर) येथे करण्यात आले. यावेळी क्षयरोगाचे प्रतिक “क्षयरोग राक्षस” पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन उपसंचालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण जनजागरण साठी “बलगम भाई “ या पात्राने टी.बी.लक्षणे बद्दल सर्व लोकांना माहिती दिली. क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्व मान्यवर व उपस्थितांनी घेतली. यावेळी जनजागरणपर माहितीपट दाखविण्यात आले. 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान कोल्हापुर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
जिल्हा शल्यचित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ.उषादेवी कुंभार, माजी सभापती सौ.अश्विनी धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फारूक देसाई, वाशी सरपंच गीता लोहार, वैद्यकीय अधिकारी प्रा.केंद्र कणेरी डॉ.भूषण मस्के, क्षयरोग केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम, डॉ. विनायक भोई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपकेंद्र वाशीचे सी,एच ओ डॉ. अनिल गंबरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मानसी कदम यांनी आभार मानले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार प्रस्ताविक भाषणात म्हणाल्या, क्षयरोगाचे निदान होण्यापासून अदयापही वंचित असणा-या सर्व क्षयरुग्णांचा प्रत्यक्ष शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे हा सदर मोहीमेचा मुख्य उद्देश आहे. क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण, होणा-या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे केंद्रशासनातर्फे ही प्रत्यक्ष क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेकरिता कोल्हापूर जिल्हयातील प्रामुख्याने 12 तालुक्यांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 3321843 लोकसंख्या निवडलेली आहे, ह्या लोकसंख्येमध्ये 716345 इतक्या घरांमध्ये तपासणी केली जाणार आहे व एकूण 2534 इतक्या टिम तयार केल्या गेल्या आहेत. यामध्ये 5068 कर्मचारी काम करणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची कुष्ठरुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. निदान झाल्यास उपचार मोफत केला जाणार आहे. गटविकास अधिकारी करवीर जयवंत उगले म्हणाले, देशनिर्माणासाठी आरोग्य महत्वाचे आहे. यासाठी सर्वांनी सर्वेक्षणामध्ये लक्षणे असल्यास तपासणी करून घ्यावी. टी.बी. हवेतून पसरतो. जर व्यक्तीला क्षयरोगाची लक्षणे असतील तर त्यांनी तपासणी करणे गरजेचे आहे, त्याचे निदान झाल्यावर लवकर औषधउपचार करणे गरजेचे आहे, तसेच औषधे उपचार सुरु केल्यानंतर तो कोर्स पूर्ण केला पाहीजे.
डॉ.फारूक देसाई मनोगतामध्ये म्हणाले, दोन आठवडयांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, अशा रुग्णांनी या मोहीमे अंतर्गत मोफत तपासणी करुन घ्यावी. तसेच बधीर चट्टा, कानाच्या पाळया जाड होणे, भुवया विरळ होणे, अशी लक्षणे असल्यास मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचा–यांना योग्य ती माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी, दरमहा ५०० रुपये पोषण आहारासाठी क्षयरुग्णांना औषधे संपेपर्यत दिली जातात. माइकिंग,पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाटय, इत्यादी मोहीमेच्या जनजागरण विषयी माहिती दिली.