Home शैक्षणिक हरितऊर्जा संशोधनात शिवाजी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे : प्रा. हॅन्स-एरिक निल्सन

हरितऊर्जा संशोधनात शिवाजी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे : प्रा. हॅन्स-एरिक निल्सन

4 second read
0
0
30

no images were found

हरितऊर्जा संशोधनात शिवाजी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे : प्रा. हॅन्स-एरिक निल्सन

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) : हरित ऊर्जा साधनांच्या संशोधनात भारतातील शिवाजी विद्यापीठ करीत असलेले संशोधनकार्य महत्त्वाचे असून या विद्यापीठाशी सामंजस्य करार करीत असताना मोठा आनंद होत आहे, अशी भावना स्वीडन येथील एम.आय.डी. स्वीडन विद्यापीठाचे उप-कुलगुरू प्रा. हॅन्स-एरिक निल्सन यांनी व्यक्त केली.

येथील शिवाजी विद्यापीठ आणि एम.आय.डी. स्वीडन विद्यापीठ यांच्यादरम्यान आज एक महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, स्वीडन विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रा. जोहान सिडन आणि विज्ञान, तंत्रज्ञान व माध्यम विभागाचे प्रा. जोनास ऑर्टिग्रेन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्रा. निल्सन म्हणाले, स्वीडन विद्यापीठ हे अत्याधुनिक ऊर्जा साधनांच्या निर्मितीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर संशोधन करीत आहे. त्यासाठी नॅनो आणि मटेरियल सायन्समधील संशोधन महत्त्वाचे आहे. शिवाजी विद्यापीठ या क्षेत्रातील संशोधनात एक भारतातील अग्रेसर विद्यापीठ आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठासमवेत अकादमिक आणि संशोधकीय सहकार्यवृद्धी करण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात येत आहे. हरित ऊर्जा साधनांचा मागणीच्या तुलनेत तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे ऊर्जासाधनांची निर्मितीक्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने सिलीकॉन नॅनो पार्टकलसह नॅनोतंत्रज्ञानाच्या संदर्भातही दोन्ही विद्यापीठांना संयुक्त संशोधनाला मोठी संधी आहे.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी यावेळी शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधनकार्याची व सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात सौरऊर्जा उपकरणांसह आधुनिक हरित ऊर्जाविषयक संशोधन सुरू आहे. दक्षिण कोरिया, तैवान, जपान आदी देशांतील विद्यापीठांसमवेत शिवाजी विद्यापीठाचे सामंजस्य करार झाले असून त्यांच्यासमवेत संयुक्त संशोधन प्रकल्पही सुरू आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, युरोपियन इरॅस्मससारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामध्ये शिवाजी विद्यापीठ आपले योगदान देत आहे. अशा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या संधी दोन्ही विद्यापीठांनी शोधल्या पाहिजेत आणि त्याद्वारे जागतिक समुदायाला योगदान द्यायला हवे. दोन्ही विद्यापीठांतील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांच्यासाठी या सामंजस्य कराराने संयुक्त संशोधन विकासाच्या अनेक संधींची कवाडे खुली केली आहेत. त्यांचा लाभ घ्यायला हवा.

यावेळी स्वीडन विद्यापीठाच्या वतीने प्रा. निल्सन यांनी, तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. या कार्यक्रमात स्वीडन विद्यापीठातील विद्यमान संशोधक व शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी मनिषा फडतरे या ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाल्या. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिकेजेस केंद्राचे डॉ. सागर डेळेकर, आंतरराष्ट्रीय साहचर्य केंद्राचे डॉ. एस.बी. सादळे, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, नॅनो-सायन्स व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. किरण कुमार शर्मा, भूगोल अधिविभागाचे डॉ. सचिन पन्हाळकर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…