no images were found
‘सा रे ग म प 2023’च्या परीक्षकांच्या पॅनलमध्ये नीति मोहनचा समावेश
गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी अंताक्षरी, सा रे ग म पा, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे काही वास्तववादी कार्यक्रम सादर केले. अंगच्या कलागुणांवर आधारित असलेले हे रिअॅलिटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर झालेच, पण ते आजही तितकेच लोकप्रिय असून आजच्या काळातही त्यांना स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे. गतवर्षीच्या ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ हा आयकॉनिक कार्यक्रम देशातील होतकरू गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची संधी देण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे.
आता या कार्यक्रमाबद्दल ताजी बातमी अशी की ‘झी टीव्ही’ने लोकप्रिय आणि नामवंत गायिका नीति मोहन हिचा ‘सा रे ग म प 2023’ या कार्यक्रमात हिमेश रेशमियासह परीक्षक म्हणून समावेश केला आहे. नीती मोहनचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान असून तिने संगीत दिलेली ‘नैनोवाले ने’ आणि ‘इश्कवाला लव्ह’ ही गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. नीति मोहनच्या प्रवेशामुळे या कार्यक्रमाला एका अनुभवी आणि दर्दी संगीतकाराच्या जाणकारीची जोड मिळाली आहे. ती होतकरू स्पर्धकांच्या गायनकलेचे संवर्धन करून त्यांना भविष्यात नामवंत पार्श्वगायक होण्यास मदत करील. नीती मोहला ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम नवा नाही. तिने यापूर्वीही ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स 2022’ या कार्यक्रमातही परीक्षक म्हणून काम पाहिले होते. आता ती एका नव्या प्रवासावर निघाली असून देशभरातून आलेल्या अनेक गुणी होतकरू गायकांची गायनकला आजमाविण्यास उत्सुक बनली आहे.
नीति मोहन म्हणाली, “पुन्हा एकदा सा रे ग म प या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अनेक गुणी आणि अपवादात्मक गायकांना शोधून काढण्याची या कार्यक्रमाची परंपरा असून आता या परंपरेत योगदान देण्यास आणि नव्या सिंगिंग सेन्सेशनचा शोध घेण्यास मी उत्सुक बनले आहे.”