no images were found
रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे तीन दिवसीय ‘यामिनी‘ प्रदर्शन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ”यामिनी” हे भव्य प्रदर्शन येत्या १६ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबरपर्यंत तीन दिवस भरवण्यात येणार असून हे प्रदर्शन हॉटेल पॅव्हेलियन येथे भरवले जाणार आहे. प्रदर्शनात ९३ हून अधिक विविध वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल्स असणार आहेत. तर या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता रोटेरियन व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते होणार असून आमदार बंटी उर्फ सतेज पाटील, सौ.मधुरिमा राजे, छत्रपती, नासिर बोरसदवाला आणि रोटेरियन अनिरुद्ध तगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा रोटेरियन कविता घाटगे, सचिव रोटरियन प्रीती मर्दा, खजानिस डॉ. गीता पिल्लाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देताना त्यापुढे म्हणाल्या, प्रदर्शनात जवळपास शंभर स्टॉल्स आहेत. यामध्ये फॅशन आणि लाईफस्टाइलशी निगडित वस्तू, महिला व लहान मुलांचे कपडे, चप्पल, ज्वेलरी, होम डेकोर, नर्सरी यांच्याबरोबर अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. इचलकरंजी, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बेळगाव, रत्नागिरी येथून स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. या वस्तूंच्या विक्रीतून उभा राहणारा निधी हा पूर्णतः सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्यासाठी लकी ड्रॉ असून प्रसिध्द सिने कलाकार राज हंचनाळे आणि प्रतिक्षा शिवणकर या प्रदर्शनास भेट देणार आहेत.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गीजने अनेक सामाजिक कार्य केले आहे. पत्रकार परिषदेला प्रिती मंत्री, आरती पवार, विशाखा आपटे, शोभा तावडे, योगिनी कुलकर्णी, सुजाता लोहिया, अंजली मोहिते, मेघना शेळके, सुरेखा इंगळे, सविता पदे, आशा जैन, रेणुका सप्रे, यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.