
no images were found
मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांची ‘मधाचे गाव पाटगाव’ला भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ला शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन तसेच पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिजमच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार अश्विनी अडसूळ, ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यात विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, माहिती अधिकारी वृषाली पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ.प्रसाद ठाकूर तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पाटगाव मध उत्पादक शेतकरी संस्थेचे अध्यक्ष वसंत वास्कर, सचिव विलास सोनवणे, संचालक महेश ढोकरे, सुभाष कदम यांच्यासह मध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पाटगाव ग्रामपंचायत, माहिती व प्रशिक्षण दालन, सेल्फी पॉईंट, लावण्यात आलेले आकर्षक फलक, पर्यटन वाढीसाठीचे उपक्रम व जंगलातील मध पेट्यांची पाहणी करुन मध उद्योगाबाबत माहिती जाणून घेतली.
दरम्यान यानिमित्त मौनी महाराज मठ येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. शिवाजी जाधव म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने देशपातळीवर गौरवल्या गेलेल्या पाटगावचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. पाटगाव परिसरात परंपरागत चालत आलेल्या मध उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन येथील मधपाळ तंत्रशुद्ध पद्धतीने मध उत्पादन घेत आहेत. मध उद्योग व पर्यटनपूरक उद्योगातून पाटगाव स्वयंपूर्ण होत आहे. मधाचे गाव पाटगावचा अभ्यास करुन येथील मध उत्पादन, विक्री व पर्यावरणपूरक शाश्वत विकासाबाबतची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत होईल.
पाटगाव मधील मध उत्पादन जगभरात पोहोचवण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येत आहेत.
मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी मधाचे गाव पाटगाव वर आधारित माहितीपूर्ण लेखन, छायाचित्रे, माहितीपट, पुस्तिका तयार कराव्यात. सोशल मीडियासह विविध माध्यमांद्वारे पाटगावच्या मध उत्पादनाबरोबरच या भागातील पर्यटन स्थळांचीही माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले.
महेश ढोकरे यांनी मधाचे उपयोग, मध निर्मितीचे टप्पे, ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग व मार्केटिंग बाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, आपल्या उत्तम आरोग्यासाठी मधाचे सेवन रोज करणे आवश्यक आहे. मधमाशांमुळे परागीभवन होते व त्यामुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा पालनाचा उद्योग पूरक आहे. पाटगाव परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून पाटगाव हनी फार्मर्स प्रोड्युसर संस्थेची स्थापना केली आहे. याद्वारे परंपरागत चालत आलेल्या मध उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मधपाळ तंत्रशुद्ध पद्धतीने मध उत्पादन घेत आहेत.
यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देवून 1 हजार 70 मधपेट्यांचे वाटप करण्यात आले आहे. मध उद्योगामुळेच “मधाचे गाव पाटगाव” अशी गावाची ओळख निर्माण झाली आहे. पाटगाव पंचक्रोशीतील 180 सदस्य असणाऱ्या या कंपनीच्या माध्यमातून पाटगाव मधाचा ब्रँड तयार झाला आहे. यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होत आहे. शुद्ध व सेंद्रिय मधाचा पुरवठा होत असल्याने या मधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका मध पेटीतून वर्षाला सरासरी 8 ते 10 किलो पर्यंत मध उत्पादन होवून सुमारे 10 हजार रुपयांचा नफा होतो. यामुळे येथील मधपाळ वर्षभरात कमीत कमी 1 लाखापासून ते 10 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत. पाटगाव मध्ये मध उत्पादनाबरोबरच माहिती दालन, सेल्फी पॉईंट, होम स्टे तयार करण्यात येत आहे. येथील बचत गटांतील महिलांच्या उद्योग निर्मितीला तसेच या भागातील पर्यटनाला चालना देवून भागाच्या स्वयंपूर्ण होण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.