no images were found
अदाणींच्या प्रश्नावरुन उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अदाणींकडे हा प्रकल्प गेल्याने उद्धव ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. त्याविषयी राज ठाकरेंनी खोचक प्रश्न विचारला ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची नक्कल करत त्यांना खास आपल्या ठाकरी शैलीत टोला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनना आत्ता जाग का आली? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना चमचे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरेंनी जो प्रश्न विचारला त्यावर उद्धव ठाकरेंना विचारलं असता ते म्हणाले, “मला आता कळू लागलं आहे की अदाणींचे चमचे कोण कोण आहेत? आम्ही प्रश्न अदाणींना विचारला. चमचे का वाजत आहेत? आंदोलनाला गेल्यानंतर अं.. विषय काय आहे? हे विचारुन जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरुन त्यांनी प्रश्न विचारु नये. तसंच विमानाला कुठेही टोल लागत नाही त्यामुळे तो विषय येत नाही. अर्धवट माहितीवरुन कुणी प्रश्न विचारु नयेत. त्या शालीचं वजन पेलतंय का ते बघा. अर्धवट माहितीवरुन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत नाही. आम्ही धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलो. धारावीचा विकास झाला पाहिजे. धारावीचा विकास सरकारच्या माध्यमातून करायचा हे मी सत्तेत असताना ठरवलं म्हणून आमचं सरकार पाडलं का? ” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
राज ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणींना देण्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला. “मोठा प्रकल्प मुंबईत येतोय. तो मुळात परस्पर अदाणींना का दिला? इथपासून सगळं सुरू होतंय. अदाणींकडे असं काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा अशा सर्व गोष्टी तेच हाताळू शकतात? टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही त्यांच्याकडून डिझाईन्स मागवायला हवे होते. टेंडर्स काढायला हवे होते. तिथे नेमकं काय होणार आहे ते कळायला हवं होतं. पण ते झालं नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या मोर्चावरही टीकास्र सोडलं. “मला फक्त प्रश्न एवढाच आहे की आत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांना का जाग आली? हे जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले असतील. पण मग आज का मोर्चा काढला? सेटलमेंट व्यवस्थित होत नाही म्हणून का?” असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी अदाणींचे चमचे म्हणत त्यांना उत्तर दिलं आहे.