no images were found
विद्यापीठात सहकार चळवळीवरील चर्चेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उपस्थिती
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगातील विशेषतः अविकसित व विकसनशील देशांना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्र आज अनिवार्य होत आहे. सहकार क्षेत्र व ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने ‘कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ’ या विषयावर आयोजित केलेली विशेष चर्चा काल उत्साहात संपन्न झाली.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट व वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ को-ऑपरेटिव मॅनेजमेंट, पुणे यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख उपस्थित होते. या चर्चेत आशिया व आफ्रिका खंडामधील बांगलादेश, इजिप्त, गांबिया, घाना, जॉर्डन,केनिया, मॉरीशस,नांबीया, नायजेरिया, ओमान, जंबिया आदी देशांसह इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स संस्थेचे
प्रतिनिधी सहभागी झाले.
वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ को-ऑपरेटिव मॅनेजमेंटचे प्रकल्प संचालक प्रा. डॉ. डी. रवी यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश व स्वरूप याबद्दल मांडणी केली. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र-संचालक डॉ. नितीन माळी यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी डॉ. माळी यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा झालेला सर्वांगीण विकास, ग्रामीण जीवनमान, अर्थकारण, सामाजिक बदल आणि विविध उपक्रम याबद्दल सविस्तर मांडणी केली. शिवाय त्यांनी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभाग, अभ्यासक्रम, संशोधन, प्रकल्प व ग्रामीण विकासातील योगदान यांची थोडक्यात माहिती करून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी सहकार क्षेत्र, ग्रामीण विकास, शाश्वत विकास उद्दिष्टे व भारतीय अर्थव्यवस्था याबद्दल सहभागी प्रतिनिधींना उद्दबोधित केले. डॉ. देशमुख यांनी सांगितले की, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय दृष्टिकोनानुसार जगातील विशेषतः विकसनशील देशातील ग्रामीण भागांचा विकास साध्य करण्यासाठी सहकार हे एक प्रभावी साधन आहे. भारतीय अर्थव्यवस्था आज जगातील पाचव्या स्थानी असणारी अर्थव्यवस्था आहे. पुढील कांही वर्षामध्ये भारतास तिसऱ्या क्रमांकाची
अर्थव्यवस्था बनविण्यासाठी ग्रामीण भागाची भूमिका ही महत्वाची असणार आहे. त्यासाठी सहकार हेच प्रमुख क्षेत्र राहणार असून त्यादृष्टीने नियोजन व धोरणे राबविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी त्यांनी सहभागी परदेशी प्रतिनिधींना शिवाजी विद्यापीठ, कार्यरत अधिविभाग, संशोधन व विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहिती करून दिली. या कार्यक्रमाची प्रस्तावना सहायक प्राध्यापिका डॉ. कविता वड्राळे यांनी केली. सूत्रसंचालन एम.एस.डब्लू. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कोमल गरड यांनी केले
तर आभार सहायक प्राध्यापक डॉ. मूनकीर मुजावर यांनी मानले. या कार्यक्रमास अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.