
no images were found
कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे यांची निवड
कोल्हापूर : प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य शासनाने विभागीय अधिस्वीकृती समित्या 11 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये गठित केल्या आहेत.कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य श्री. समीर सुधाकर देशपांडे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करुन राज्य अधिस्वीकृती समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.त्यास राज्य समितीने मान्यता दिली असून कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्री. समीर सुधाकर देशपांडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक (मा.) सुनिल सोनटक्के यांनी दिली.
कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. सुखदेव गिरी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे समिती अध्यक्षपदी श्री. समीर देशपांडे यांची समितीचे सदस्य श्री. सुखदेव गिरी, गजानन नाईक, निखील पंडीतराव व प्रताप नाईक यांनी श्री. देशपांडे यांची समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करुन राज्य अधिस्वीकृती समितीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले होते. श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीस राज्य अधिस्वीकृती समितीने मान्यता देवून कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्री. समीर देशपांडे यांचे नाव घोषीत केले आहे.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती नियमान्वये राज्य शाससाने राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्या गठीत केल्या आहेत. कोल्हापूर माहिती विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृतीपत्रिका विषयक कामकाज या समितीव्दारे करण्यात येणार आहे.
देशपांडे हे गेली २९ वर्षे पूर्ण वेळ पत्रकारितेमध्ये असून याआधी त्यांनी दैनिक तरूण भारत, दैनिक दिव्य मराठीमध्ये काम केले असून सध्या ते लोकमतमध्ये वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर प्रेस क्लबचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार त्यांनी दोन वेळा पटकावला असून राज्य शासनाने त्यांना महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरवले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक वाचनालय बेळगाव यासह अनेक संस्थांनी त्यांना याआधी गौरवले आहे. प्रतिभावंतांचे आजरे आणि गाथा ग्रामविकासाची ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.