
no images were found
गणेशोत्सव रंगे शेमारू मराठीबाणाच्या महाआरतीसंगे
गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण असतं. या जल्लोषाच्या वातावरणात अधिक भर घालते ती गणपतीची आरती. घरचा गणपती असो की सार्वजनिक मंडळाचा गणपती तिथे सर्वांच्या सोबतीने गणरायाची आरती करण्याची बातच वेगळी. हीच बाब लक्षात घेऊन यावर्षी शेमारू मराठीबाणा या वाहिनीने ही आरती अधिकच स्पेशल करण्याचा आणि गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत करण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. महाराष्ट्राच्या विविध भागांमधील आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि बाप्पाच्या लाडक्या भक्तांपर्यंत पोहचण्यासाठी शेमारू मराठीबाणाने भक्तीमार्गाचा वापर केला. बाप्पाची महाआरती जल्लोषात करण्यासाठी शेमारू मराठीबाणाने पारंपरिक वाद्यांसह आपली वादकांची टीम घरोघरी पाठवली आणि या वादकांच्या साथ संगतीने बाप्पाची महाआरती मोठ्या थाटात पार पडली. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी शेमारू मराठीबाणा ही पहिलीच वाहिनी ठरली आहे हे विशेष.
अनेक दर्जेदार लोकप्रिय चित्रपट, मनोरंजक कार्यक्रम तसेच ‘आनंदवारी- उत्सव किर्तनाचा’ आणि ‘गजर माऊलीचा’ यांसारखे प्रबोधनात्मक किर्तनाचे कार्यक्रम प्रसारित करणारी शेमारू मराठीबाणाही वाहिनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन देण्यासाठी ही वाहिनी सतत प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यावर्षी गणेशोत्सवात शेमारू मराठीबाणाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी हा गणेशोत्सव अधिक खास आणि अविस्मरणीय करण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा विचार केला आणि हा महाआरतीचा उपक्रम राबविला. शेमारू मराठीबाणाच्या वादकांची टीम टाळ, मृदुंग, ढोलकी, संबळ या पारंपरिक वाद्यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेली आणि घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींच्या ठिकाणी त्यांनी महाआरती केली. या वाद्यांच्या संगतीने ही महाआरती अधिकच रंगतदार झाली. आपल्या लाडक्या गणरायाची अशी साग्रसंगीत आरती करता आली या भावनेने भक्तमंडळीही भरून पावली आणि त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं हे विशेष. या उपक्रमांतर्गत शेमारू मराठीबाणाच्या वादकांची टीम सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील तब्बल पाचशेहून अधिक घरगुती गणपती आणि पन्नासहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्यापर्यंत पोहोचली. या घरगुती गणपतींच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या महाआरतीला या उपक्रमामुळे एक वेगळी रंगत आली.
गणोशोत्सव म्हणजे केवळ धार्मिकच नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच या महाआरतीच्या उपक्रमाद्वारे आपला सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा जपता यावा असा आमचा उद्देश होता असं शेमारू मराठीबाणा वाहिनीतर्फे सांगण्यात आलं. गणपतीची आरती या उत्सवाचा आनंद आणि उत्साह द्विगुणीत करत असते. या महाआरतीच्या निमित्ताने आम्ही हजारो कुटुंबांशी जोडल्या गेलो याचा विशेष आनंद आहे अशी भावनाही वाहिनीतर्फे व्यक्त करण्यात आली.