
no images were found
8 डिसेंबर रोजी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने दि. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. १८ ते १९ वयोगटातील नवमतदार नोंदणीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचेकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. ०८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांचे ठिकाणी करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले आहे.
या विशेष शिबिरामध्ये १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपल्या नावाची मतदार म्हणून नोंदणी करुन घ्यावी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क, अधिकार बजावता येईल असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
सर्व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडून कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडून जन्म नोंद रजिस्टर मधील नोंदीचा आढावा घेवून त्यामधील जानेवारी २००३ ते ३१ डिसेंबर, २००५ या कालावधीतील जन्मलेल्या बालकांची यादी तसेच सर्व शाळांमधून सन २०१९. सन २०२० व २०२१ मध्ये इयत्ता १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्राप्त करुन घेण्यात येणार आहेत. तसेच त्यानुसार १८ ते १९ वयोगटातील नवमतदार नोंदणीची कार्यवाही विशेष शिबिरात राबविण्यात येणार आहे.