
no images were found
‘उफ्फ… ये लव है मुश्किल’ या आगामी कौटुंबिक रोमॅंटिक कॉमेडी मालिकेत शब्बीर अहलूवालिया एका नव्याच अवतारात दिसणार
हलक्या-फुलक्या आणि कौटुंबिक पसंतीच्या मालिका सादर करण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या सोनी सब वाहिनीने आपल्या ‘उफ्फ… ये लव है मुश्किल’ या आगामी रोमॅंटिक कॉमेडी मालिकेचे आकर्षक टीझर जारी केले आहे. विनोद आणि हळुवारपणा यांचे उत्कृष्ट मिश्रण सादर करण्याची हमी देणारी ही मालिका कौटुंबिक जीवनाच्या धमाल गोंधळात प्रेमाची ताकद दर्शविते.
या अगळ्यावेगळ्या मालिकेत लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता शब्बीर अहलूवालिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये दिसते की, शब्बीरला काहीतरी अगदी वेगळे हवे आहे आणि या नवीन अवतारात त्याला ते नक्कीच मिळाले आहे! आजवर प्राधान्याने तत्वनिष्ठ आणि ‘आदर्श’ व्यक्तिरेखा साकारणारा शब्बीर यावेळी हा साचा मोडून एका विक्षिप्त, तिरसट आणि काहीशा अजागळ अवतारात दिसणार आहे. प्रेक्षकांनी बराच काळ शब्बीरच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली आहे आणि अखेरीस या मालिकेच्या रूपात त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. ‘उफ्फ… ये लव है मुश्किल’ हा शब्बीरसाठी देखील एक अगदी वेगळा अध्याय आहे आणि सोनी सबच्या वैविध्यपूर्ण मालिकेत आता एक नवी भर पडत आहे.
सोनी सबवरील आगामी मालिकेत युग सिन्हा ही व्यक्तिरेखा साकारत असलेला शब्बीर अहलूवालिया म्हणतो, “एका अगदीच आगळ्यावेगळ्या भूमिकेतून टेलिव्हिजनवर परत येताना मी रोमांचित झालो आहे. इतकी वर्षे ‘आदर्श नवरा’ किंवा रोमॅंटिक हीरो साकारल्यानंतर मी डोळसपणे एका वेगळ्या व्यक्तिरेखेच्या शोधात होतो. ‘उफ्फ… ये लव है मुश्किल’ ही मालिका एका व्यक्तिरेखेची कहाणी नाही, तर दोन विरुद्ध प्रकृतीच्या व्यक्तींमधील एक प्रेमकहाणी आहे आणि एका अतरंगी कुटुंबाचा सदस्य म्हणून जडणघडण झालेल्या एका विचित्र पण लाघवी स्वभावाच्या नायकाची देखील कहाणी आहे. सोनी सबवर ही कहाणी जिवंत करण्यास मी आतुर आहे. प्रेक्षकांना युग आणि त्याचे चित्रविचित्र जग बघायला नक्कीच मजा येणार आहे.”