
no images were found
‘डी. बी. पाटील सरांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी’ – चंद्रदीप नरके
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्वर्गीय डी. बी. पाटील फौंडेशनच्या वतीने आयोजित डी. बी. पाटील जयंती, माहितीपट अनावरण व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले ‘शिस्त, वक्तशीरपणा, कामातील बारकावा, साधी राहणी, समाजभान असे संस्कार डी. बी. पाटील सरांनी माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये रुजवले, ज्यामुळे आमचे आयुष्य व करिअर घडले. सरांप्रती आमच्यात भितीयुक्त आदर असायचा. सरांच्या पश्चात शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळीच पोकळी प्रकर्षाने जाणवते. डी. बी. पाटील फौंडेशनच्या सर्व उपक्रमांस माझे सदैव पाठबळ राहील.’
हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी डी. बी. पाटील सरांच्या मार्गदर्शनातून श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या झालेल्या विस्ताराचा उल्लेख केला. ते म्हणाले ‘योग्य कामासाठी योग्य माणसे वेचुन त्यांना विश्वास देवून कामात जुंपण्याची व कामाचा पाठपुरावा करण्याची सरांची हातोटी विलक्षण होती. त्यांचा शब्द अखेरचा असायचा. फौंडेशनच्या कार्यासाठी शुभेच्छा.’
समारंभाचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी डी. बी. पाटील सरांसोबतच्या आपल्या अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले ‘शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न त्यांनी शासन दरबारी सोडवले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य चिरंतर राहील.’
कार्यक्रमाची प्रस्तावना फौंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक सविता पाटील यांनी केली. त्या म्हणाल्या ‘खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी हा सरांच्या शैक्षणिक विचारांच्या केंद्रस्थानी होता. त्यांच्या पाऊलखुणांवर मार्गक्रमण करणे हे या फौंडेशनचे उद्दिष्ट आहे. फौंडेशनचे ॲप, वेबसाईट व उपक्रमांच्या माध्यमातून तज्ञ विषय शिक्षकांचे पाठ, मार्गदर्शनपर व्याख्याने, शैक्षणिक साहित्य जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना पाठबळ देवू. विशेषकरून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन पुरवण्यावर भर असेल. डी. बी. पाटील सरांच्या विचाराने पुढे येणाऱ्या सर्वांचे फौंडेशनमध्ये स्वागत करू.’
फौंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘माझे गुरू’ या ऑनलाईन स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. स्पर्धा विजेते असे, शालेय गटात नारायणी जप्तनमुलुख (प्रथम), वनिता शिंदे (द्वितीय), विरेंद्र मोसमकर (तृतीय). खुल्या गटात मिलिंद पाटील (प्रथम), अशोक मानकर (द्वितीय), शिवाजी बारड (तृतीय). याचवेळी दहावीच्या ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस अमोल देसाई यांनी तयार केलेल्या डी. बी. पाटील सरांच्या आठवणींवर आधारित माहितीपटाचे तसेच निशांत गोंधळी यांनी सरांवरील केलेल्या ‘दीपस्तंभ’ या कवितेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० उपस्थितांनी फौंडेशनचे सदस्यत्व स्विकारले.
फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक पी. सी. पाटील, आर. डी. पाटील, विनय पाटील, कोजिमाशीचे दादासाहेब लाड, लक्ष्मण पंडे, न्यू पॉलिटेक्निक प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, डाॅ. दिलीप पाटील, जयंत पाटील, सुमन शिंदे, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले, डी. जी. किल्लेदार यांनी आभार मानले. डाॅ. मनिषा नायकवडी यांच्या सुरेल आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सदस्य संदीप पंडे, समीर घोरपडे, अनिल इंगळे, संग्रामसिंह पाटील, बाजीराव राजीगरे, सुहासचंद्र देशमुख, सचिन पाटील, युवराज साळोखे, अशोक पाटील, सानवी पंडे यांनी कष्ट घेतले.