
no images were found
प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक आणि रंगतदार कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कथानक आता एक रंजक वळण घेत असून, अविनाश (इशांक सल्लुजा) आणि दिव्या (शुभांशी रघुवंशी) हे एकमेकांवरील प्रेम अखेर कबूल करतात. त्याचवेळी वसुधा (प्रिया ठाकूर) आणि देवांश (अभिषेक शर्मा) करिश्मा (प्रतिक्षा राय) चे खरे इरादे उघड करण्याचा प्रयत्न करतात. करिश्मा आणि अविनाशचं लग्न थांबवण्यासाठी हे चौघे एकत्र येतात आणि दिव्याच्या पुश्तैनी घरी जातात, जिथे ते तिच्या वडिलांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतात. या महत्त्वाच्या प्रसंगाचे चित्रण अधिक प्रभावी व्हावे म्हणून संपूर्ण टीम जयपूरला गेली होती आणि तिथल्या भव्य वास्तूशिल्प आणि समृद्ध संस्कृतीचा उपयोग या नाट्यमय घडामोडींसाठी पार्श्वभूमी म्हणून केला गेला.
मुख्य अभिनेत्री प्रिया ठाकूरसाठी हे शूट खास होते कारण ही तिची गुलाबी शहर जयपूरला पहिलीच भेट होती. कॅमेऱ्यांपलीकडे आणि शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढून तिने जयपूरचं सौंदर्य आणि संस्कृती अनुभवली. स्थानिक लोकांशी संवाद साधणे, राजस्थानी वाक्प्रचार शिकणे अशा अनेक गोष्टींचा तिने अनुभव घेतला. मूळची खवय्या असलेल्या प्रियाने इशांक आणि शुभांशीसोबत राजस्थानचे खास पदार्थ – प्याज कचोरी, दाल बाटी चुरमा आणि चाट यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. एवढ्यावरच न थांबता संपूर्ण टीमने श्री खाटू श्याम मंदिरालाही भेट दिली, ज्यामुळे हा प्रवास आणखीनच संस्मरणीय ठरला.
जयपूरमधील शूटिंगबद्दल बोलताना प्रिया ठाकूर म्हणाली, “जयपूरमध्ये शूट करणे हा एक जादुई अनुभव होता. राजस्थानात ‘वसुधा’ची गोष्ट साकारताना माझ्या मस्त कलाकार आणि टीमसोबत अनेक अविस्मरणीय आठवणी तयार झाल्या, त्यामुळे हा प्रवास आणखीनच खास बनला. जयपूरच्या खाण्याबद्दल मी आधीपासूनच खूप ऐकलं होतं, त्यामुळे जेव्हा मला कळलं की आपलं शूट तिथं होणार आहे, तेव्हा मी लगेचच स्थानिक पदार्थांची एक यादीच तयार केली! खरं सांगायचं तर मी एकदम फुडी आहे, त्यामुळे तिथली चविष्ट खाद्यसंस्कृती अनुभवायला मिळणार याचा खूप उत्साह होता. मी माझ्या सहकलाकारांसोबत जयपूरचा फेरफटका मारला, प्याज कचोरी, दाल बाटी चुरमा आणि चाटसारख्या राजस्थानी पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला आणि खाटू श्याम मंदिराच्या शांततेचा अनुभव घेतला. जयपूरचं रंगीबेरंगी वातावरण, ऐतिहासिक वास्तू आणि बाजारपेठा यांनी सगळ्यांच्याच मनात एक वेगळी छाप सोडली. पण जे सर्वात जास्त भावलं ते म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांनी दिलेलं प्रेम आणि आपुलकी. त्यांनी त्यांच्या शहराबद्दल गोष्टी सांगितल्या, नवीन गोष्टी ट्राय करायला प्रोत्साहित केलं – हा खरोखरच एक खूप गोड आणि समृद्ध अनुभव होता.”
जयपूरच्या रंगात रंगत असताना टीमने एकत्र बसून जेवलेले जेवण, फिरायला गेलेले असतानाचे क्षण आणि धमालमस्तीने भरलेल्या संध्या हे सगळं त्यांच्या नात्याला अजून घट्ट करत गेलं. वसुधा, देवांश आणि अविनाश दिव्याच्या वडिलांची मान्यता मिळवण्यात यशस्वी होतील का? की करिश्माचे डावपेच यशस्वी ठरतील?की शेवटी अविनाशचं लग्न करिश्माशी होईल?