
no images were found
बी.एस.पाटील यांचे लेखन हृदयस्पर्शी आणि प्रवाही – माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी बी.एस.पाटील यांचे हृदयस्पर्शी आणि प्रवाही लेखन वाचकांना भावते, असे उद्गार विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी आज सायंकाळी येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागांतर्गत असलेल्या पर्यटन आणि प्रवास सुविधा केंद्राच्यावतीने विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते बी.एस.पाटील लिखीत ‘मुसाफिर हॅूं यारो’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ.साळुंखे बोलत होते. पदार्थविज्ञान अधिविभागामधील सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माजी कुलगुरू डॉ.साळुंखे पुढे म्हणाले, या पुस्तकामध्ये विविध विषयांवर लेखन झालेले आहे. एेतिहासिक घडामोडींची माहिती करून घेण्याबरोबरच जीवनातील तणाव सहलीच्या माध्यमातून कमी करण्यासाठी या पुस्तकाचे वाचन करणे महत्वाचे ठरेल. मित्रांसमवेत आनंददायी प्रवास, विविध ठिकाणांच्या सहलींच्या माहितींचे संकलन अभ्यासपूर्ण केल्याने हे पुस्तक वैशिष्टपूर्ण झालेले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, या पुस्तकामध्ये उत्तम प्रवासवर्णना बरोबरच हळवेपणा आणि संवेदनशीलता प्रकर्षाने दिसून येते. पुस्तकाचे जितके श्रेय लेखकांना आहे तितकेच श्रेय त्यांच्या समवेत आनंदाने प्रवास करणारे त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना सुध्दा आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यावर, आपण आपल्या जीवनातील धावपळी विसरून जातो आणि एका नवीन विश्वात प्रवेश करतो. साहित्यभान असणारे उत्तम पर्याटनाचे वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक होय.
याप्रसंगी पुस्तकाचे लेखक बी.एस.पाटील यांचेसह इतिहास अधिविभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.अरूण भोसले, चंद्रकांत कुंभार, अशोक पट्टणशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यटन आणि प्रवास सुविधा केंद्राचे समन्वयक डॉ.मीना पोतदार यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री प्रकाशनच्या प्रकाशक श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, उपकुलसचिव लेखा प्रिया देशमुख, मुख्य लेखापाल दुर्गाली गायकवाड, अजित चौगुले, डॉ.बी.एम.हिर्डेकर, डॉ. अवनिश पाटील यांचेसह बी.एस.पाटील यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि प्रशासनातील सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
—–