Home Uncategorized मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा – डॉ. दातार यांचा सल्ला

मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा – डॉ. दातार यांचा सल्ला

2 second read
0
0
77

no images were found

मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा – डॉ. दातार यांचा सल्ला

 

मुंबई  : मराठी नवउद्योजकांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घेणे गरजेचे आहे, असा सल्ला ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकताच येथे दिला. मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांच्या हस्ते देऊन डॉ. दातार यांना सन्मानित करण्यात आले. रोख २५,००० रुपये, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गिरगावमधील डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. दातार यांनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या यंदाच्या ८८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बीजभाषण केले. त्यामध्ये त्यांनी उद्योग क्षेत्रातील आपल्या यशस्वी वाटचालीचे गमक उलगडून सांगितले. ते म्हणाले, “व्यावसायिक नवा असो, वा प्रस्थापित, तो एकाच चाकोरीने व एकाच मानसिकतेने वागत राहिल्यास लवकरच कालबाह्य होतो. परिवर्तन संसार का नियम है, हा मंत्र लक्षात ठेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वापासून ते कार्यशैलीपर्यंत वेळोवेळी बदल करत गेल्यास आपण टिकून राहतो. मी हाच मंत्र अनुसरला.

डॉ. दातार म्हणाले, उद्योग सुरू करणे सोपे असते, पण तो सातत्याने फायद्यात ठेवणे हे अधिक आव्हानात्मक असते. व्यवसायात यश आणि विस्तारासाठी नवीन तंत्रज्ञान फार महत्त्वाचे ठरते. पूर्वी आमचीही दुकाने पारंपरिक पद्धतीने चालत, परंतु मी आजूबाजूच्या बदलत्या वातावरणाचा, ग्राहकांच्या नव्या अपेक्षांचा आणि तंत्रज्ञानातील बदलाचा कानोसा घेतला व स्वतःला व व्यवसायाला त्यानुसार आमूलाग्र बदलले. साध्या दुकानांचे रुपांतर सुपर स्टोअर्समध्ये केले, ग्राहकांना स्वतः वस्तू हाताळण्याचा व निवडण्याची मोकळीक मिळाली, त्यांचे बिलिंग संगणक व स्कॅनरच्या माध्यमातून वेगवान होऊ लागले. उत्पादने मानवी हाताचा स्पर्श न होता ग्राहकांच्या हातात शुद्ध, सुरक्षित पडावीत, यासाठी मी अत्याधुनिक यंत्रसामग्री व पॅकेजिंग यंत्रणा बसवली. स्वतःचे मसाला कारखाने व पिठाच्या गिरण्या उघडल्या, आयात-निर्यात कंपनी सुरू केली. त्या जोरावर मी आमच्या पिकॉक ब्रँडची ७०० उत्पादने बनवत आहे आणि ९००० हून अधिक भारतीय उत्पादने आखाती देशांत व आफ्रिका खंडात पोचवली आहेत.

ते पुढे म्हणाले,आजचा काळ प्रत्येकानेच नवे शिकण्याचा आहे. सध्या ई-कॉमर्स, ऑनलाईन पेमेंट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया मार्केटिंग असे नवे तंत्रज्ञान उद्योगांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. आपण त्यांचा अचूक लाभ उठवला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्योग स्वतःच्या पायावर स्थिरावल्यावर उद्योजकाने आपल्या लगेचच उत्पादनांचे व व्यवसायाचे ब्रँडिंग व प्रसिद्धी केली पाहिजे कारण नवी पिढी खरेदी करताना ब्रँडचा बारकाईने विचार करते. अबोल किंवा प्रसिद्धीविन्मुख राहून कधीही धंदा होत नसतो. बोलणाऱ्याची मातीही खपते, पण न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत, ही म्हण कायम लक्षात ठेवली पाहिजे.”

कार्यक्रमात डॉ. दातार यांच्या हस्ते चार साहित्य पुरस्कारांचे वितरण झाले. नामवंत लेखक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांना सहचारिणी पुरस्कार, लेखिका अनुराधा कुलकर्णी यांना चंद्रगिरी पुरस्कार, मिलिंद कीर्ती यांना रा. भि. स्मृत्यर्थ वैचारिक पुरस्कार व चित्रकार विजय बोधनकर यांना साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी स्वागत केले, कार्याध्यक्ष उषा तांबे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

मुंबई मराठी साहित्य संघ ही सन १९३५ मध्ये स्थापन झालेली ख्यातनाम जुनी संस्था मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, नाट्य या क्षेत्रांत कार्यरत आहे. तिच्यातर्फे मराठी विश्वातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व यशस्वी व्यक्तींना दरवर्षी ‘मराठी यशवंत पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. याआधी हा पुरस्कार चित्रपट व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव चितळे, उद्योजक सुभाष दांडेकर, संगीतकार यशवंत देव, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर अशा नामवंतांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …