no images were found
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने सत्तांतरानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या अंदाज लावला जात आहे.
अशोक चव्हाण हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर राज्यात नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीवेळी ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारांचा गटही गैरहजर असल्याने त्यांच्यातील नाराजी उघड झाली होती. त्यांनतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असून त्यातील दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत. आता शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये फूट पडून महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.