no images were found
गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेल वर शुक्रवार दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेल्या सामाजिक कामासाठी सन 2022 च्या गणेश विसर्जनानंतर ते यावर्षीच्या गणेशोत्सवापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनांक 10 ते 28 सप्टेंबर 2023 हा कालावधी विचारात घेतला जाईल.
जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समन्वयाखाली नियुक्त निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व प्रत्येक तालुका निहाय तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात भेट देईल. समितीला मंडळांनी आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडिओग्राफी भेटीवेळी सादर करावेत. स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरुन राज्य स्तरावर निवड होणाऱ्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरीत करण्यात येईल. यात सन 2023 मध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्या गणेशोसव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, व्दितीय क्रमांक 2 लाख 50 हजार रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये असे आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सन 2023 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कार समितीचे अध्यक्ष संजय तेली यांनी दिली आहे.