no images were found
येत्या सहा महिन्यात विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा देणार – पालकमंत्री
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा कार्यालय व इंडोकाउंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती केली जाणार आहे. याचे भूमिपूजन जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या व्यायाम शाळेसाठी सीएसआर अंतर्गत इंडोकाउंट फाउंडेशन तर्फे 55 लक्ष रूपये देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपसंचालक माणिक वाघमारे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्वीनी सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, इंडोकाउंट फाउंडेशनचे शैलेश सरनोबत, संदिप कुमार, अमोज पाटील व इतर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदाच विभागीय क्रीडा परिसराची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले येत्या सहा महिन्यांमध्ये येथील संकुलात असणाऱ्या विविध सोयीसुविधांचा विकास करून येथील चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू. जलतरण तलावही येत्या काळात उत्कृष्ट दर्जाचा तयार होईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिले. जिल्ह्यातील पारंपारिक खेळ तसेच आत्ताच्या पिढीतील नवे क्रीडा प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे खेळले जातात या अनुषंगाने उच्च दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी त्या पद्धतीचे सुविधा जिल्ह्यात येत्या काळात तयार होतील.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध व्यायाम प्रकार मार्गदर्शन होण्यासाठी सर्वसामान्यांकरिता फलक लावण्यात येणार आहेत. याचेही उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी विभागीय क्रीडा संकुलात केले.