
no images were found
जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी चे प्रशिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची माहिती घेवून या परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी व्हावे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर यांच्यामार्फत मोफत वितरित करण्यात आलेल्या टॅबलेटचा वापर करुन सर्वांगीण प्रगती साधावी, असे मत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहभाग, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी ) पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. याचाच एक भाग म्हणून दहावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था
(महाज्योती) नागपूर यांच्यावतीने जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिम कार्ड देण्याची योजना राबविण्यात येते. त्यानुसारच सामाजिक न्याय भवनात हा कार्यक्रम पार पडला.
सध्याचे युग स्पर्धात्मक असून भविष्यात इंजिनिअरिंग, डॉक्टर याबरोबरच विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांव्दारे अधिकाधिक माहिती घेवून स्पर्धेच्या युगात टिकून रहावे. तसेच मुबलक ज्ञान प्राप्त करुन घेऊन परिस्थितीला सामोरे जावे, असे प्रतिपादन शाहुवाडीचे उपविभागीय अधिकारी निखिल खेमनार यांनी केले. महाज्योती आयोजित मोफत टॅबलेट वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करुन विद्यार्थ्यांनी टॅबलेटचा वापर योग्य कारणासाठी करावा व ज्ञान मिळवावे. इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती घेण्याकरिता जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता असते. याकरिता विद्यार्थ्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे अर्ज सादर करुन जात प्रमाणपत्र पडताळणी करुन घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी केले.
कार्यक्रमामध्ये मोफत टॅब व डाटा सिम कार्ड प्राप्त सिमरन म्हणाली, या मोफत टॅबलेट व डाटा सिम कार्डचा आम्हाला आमच्या शैक्षणिक विकासासाठी व शैक्षणिक माहिती घेण्याकरिता खूप चांगली मदत होईल. याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती ) नागपूर व महाराष्ट्र शासनाचे आभार मानत असल्याचे तिने सांगितले.
सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय कोल्हापूर व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती पुणे नागपूर यांच्यावतीने ४७ विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डाटा सिम कार्ड वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, समाज कल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे यांच्या सह कर्मचारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी केले तर आभार तालुका समन्वयक सचिन कांबळे यांनी मानले.