
no images were found
दिव्यांग केंद्र सक्षम होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे यावे – डॉ. योगेश दुबे
कोल्हापूर : राज्यातील दिव्यांग केंद्र सक्षम होण्यासाठी लोक प्रतिनिधी, दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे विशेष समन्वय डॉ. योगेश दुबे यांनी केले. डॉ. दुबे यांनी कोल्हापूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. दुबे यांनी कामकाजाची माहिती घेतली व अर्ज, अडचणी बाबत चर्चा केली.
डॉ. दुबे म्हणाले, दिव्यांग केंद्राची रंगरंगोटी, फिजिओथेरपीचे अद्यावत कक्ष, ऑर्थोचे कक्ष व अनुषंगिक मदती करीता लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा या केंद्रात असाव्यात, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. जिल्हा नियोजन मंडळाकडून या केंद्रासाठी भरीव आर्थिक निधी मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल.
वास्तविक दिव्यांग पुनर्वसन केंद्र शहराच्या मध्यवर्ती असले पाहिजे. दिव्यांगांच्या दळणवळणासाठी त्रास होणार नाही व त्यांचा अपव्यव होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
दिव्यांग केंद्राच्यावतीने अतुल जोशी यांनी डॉ. दुबे यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत दिव्यांग केंद्रातील जनसंपर्क अधिकारी प्रियदर्शिनी सावंत, मयुरी चौगले यांनी कामकाजाविषयी माहिती दिली. डॉ. दुबे यांनी दिव्यांग केंद्राचे कार्य सक्षमपणाने सुरु असल्याबाबद्दल समाधान व्यक्त केले.
डॉ. दुबे यांनी साधला दिव्यांगाशी संवाद
डॉ. दुबे केंद्रात अचानक आले असता, काही दिव्यांग कामानिमित्त उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग सारा सर्फराज पठाण रा. कोल्हापूर व अंध दिव्यांग हिरालाल रावसाहेब कांबळे रा. निगवे दुमाला ता. करवीर यांच्याशी संवाद साधला. यावेळी या दिव्यांगांनी वैश्विक कार्डसाठी सीपीआर मधून तातडीने मदत मिळावी. दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी आर्थिक निधी मिळावा. शासकीय कार्यालयात स्वच्छता असावी, स्वच्छता गृहात कमोड सह सर्व सुविधा असाव्यात. दिव्यांगाना मंदिर, मस्जिद व प्रार्थना स्थळांना जाण्यासाठी रॅम्प व्हावेत व सर्व योजना एका छताखाली मिळाव्यात, अशा मागण्या दिव्यांग महिला सारा पठाण यांनी केल्या. यावेळी या मागण्यांसाठी शासनाकडे प्रयत्न करण्याची ग्वाही डॉ. दुबे यांनी दिली.