no images were found
‘इट राइट मिलेट मेला’ वॉकेथॉन विद्यापीठात जल्लोषात; दीड हजारांहून अधिक जणांचा सहभाग
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय.-पश्चिम विभाग), ज्युबिलंट फूड्स प्रा.लि. (डॉमिनोज्) आणि परफेट्टी व्हॅन मिले यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आज विद्यापीठात ‘इट राईट मिलेट मेला’ या एकदिवसीय उपक्रमास मोठ्या जल्लोषात व आरोग्यदायी वॉकेथॉनने प्रारंभ झाला. या वॉकेथॉनमध्ये दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसह कोल्हापूरकर नागरिकांनी सहभाग नोंदविला.
आज सकाळी ठीक साडेसहा वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात एरोबिक्स प्रशिक्षणाने उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी, सहभागींना एफ.एस.एस.ए.आय.च्या वतीने मोफत टी शर्टचे वाटप करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, एफ.एस.एस.ए.आय.च्या पश्चिम विभागाच्या सहसंचालक श्रीमती के.के. जिथा, उपसंचालक डॉ. के.यू. मेथेकर, अन्न व औषध प्राधिकरणाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, ज्युबिलंट फूड्सचे व्हाईस प्रेसिडेंट (क्वालिटी एश्यूरन्स) देवेंद्र यादव आणि परफेट्टी व्हॅन मिलेचे सहाय्यक संचालक प्रभाकर मिश्रा यांच्या उपस्थितीत वॉकेथॉनचा उद्घाटन समारंभ झाला. कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरातून वॉकेथॉन संपन्न झाली. वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी भरडधान्यांच्या अनुषंगाने जागृतीपर घोषणा देत होत्या. त्याचप्रमाणे भरडधान्याचे महत्त्व दर्शविणारे फलकही त्यांनी हाती धरले होते. तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थ्यांचे झांजपथक ढोल-ताशाच्या गजरात सहभागी झाले. त्याचप्रमाणे हलगीचा कडकडाटही सहभागींना अधिक जोमाने चालण्यासाठी प्रेरणा देत होता.
वॉकेथॉन यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, फूड सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. पी.डी. पाटील, समन्वयक डॉ. इराण्णा उडचान, एफ.एस.एस.ए.आय.च्या सहाय्यक संचालक ज्योती हर्णे, तांत्रिक संचालक देवांशी चावला यांच्यासह तंत्रज्ञान अधिविभागाच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
आरोग्यासाठी चाला; सकस आहार घ्या!
चांगल्या आरोग्यासाठी दररोज चालणे हा एक महत्त्वाचा व्यायाम आहेच, पण त्याचबरोबर सकस व पोषणमूल्यांनी युक्त आहार घेणेही आवश्यक बाब आहे. भरडधान्ये ही भारतीय अन्नसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे महत्त्व नव्याने समजावून घेऊन आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्याचा संदेश आजच्या उपक्रमातून प्रत्येक सहभागीने आपापल्या कुटुंबियांपर्यंत आणि पर्यायाने संपूर्ण समाजापर्यंत घेऊन जावयाचा आहे, असे आवाहन वॉकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.