no images were found
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तीसरे वर्ष असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सामाजिक संदेश देतात. या स्पर्धेत मंडळांनी देखावे व सजावटीद्वारे मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण इ. विषयांवर प्रबोधन करता येईल. तसेच देखावे-सजावटीसाठी लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही, मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून…, आम्ही मतदान करणार, कारण…, हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा व शहरी मतदारांची अनास्था-कारणे आणि उपाया हे विषय सोयीसाठी दिले असून, या विषयांपलीकडेही जाऊन आपणांस देखाव्यांतून संदेश देता येतील. मात्र त्यामध्ये लोकशाही. मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे याची काळजी घेण्यात यावी.
मताधिकार हा 18 वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखावा सजावटीतून जागृती करता येऊ शकते.
पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, चांगल शिक्षण, चांगली घरे, अशा अनेक सार्वजनिक सुविधा सर्व नागरिकांना विनासायास प्राप्त होणे, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र नागरिकांना या
सुविधांची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे, प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 51 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 21 हजार रुपये व उत्तेजनार्थ 10 हजार रुपयांची एकूण 10 बक्षिसे असे स्वरुप आहे. (वि.सू. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसांच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजक आणि परीक्षकांचा राहील).
सप्टेंबरमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाची स्पर्धा जाहीर होइल. त्यावेळी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती प्रसिध्द केली जाणार आहे.