
no images were found
कामगार विमा दवाखान्याचे नूतनीकरण लवकरात लवकर सुरु करा -खासदार धैर्यशील माने
खासदार धैर्यशील माने म्हणाले, वडगाव परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी उपजिल्हा रुग्णालय स्वरुपात लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल सुसज्ज स्वरुपात उभे करावे. यासाठी या हॉस्पिटलचे नूतनीकरण होण्याऐवजी हे हॉस्पिटल प्रशस्त जागेत नव्याने उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कामगार हा इचलकरंजीचा आत्मा असून त्यांच्यामुळेच इचलकरंजी इंडस्ट्री सुरु आहे. कामगारांच्या गैरसोयी, त्यांच्या अडीअडचणी दूर होण्यासाठी कामगार विभागाने प्रयत्न करावेत. इचलकरंजीतील राज्य कामगार विमा दवाखान्याच्या नूतनीकरणाचे काम जलदगतीने सुरु होण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच या दोन्ही रुग्णालयांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
आमदार अशोकराव माने म्हणाले, वडगाव भागातील नागरिकांची लोकसंख्या वाढत असून या भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य आरोग्य सुविधा देण्यासाठी लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल मोठ्या जागेमध्ये प्रशस्त स्वरुपात उभारणे आवश्यक आहे. हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु होण्यासाठी जलद कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल प्रशस्त स्वरुपात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच इचलकरंजीतील राज्य कामगार विमा योजना दवाखान्याची डागडुजी होणे आवश्यक असल्याने या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करा. गरज भासल्यास रुग्णांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या दवाखान्याच्या नजीक असणाऱ्या टीबी क्लिनिकच्या इमारतीची चाचपणी करा, अशा सूचना देऊन कामगार विमा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर अरेरावी झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.