
no images were found
शाळाबाहय, स्थलांतरीत मुलांचे होणार सर्वेक्षण
कोल्हापूर : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने 03 ते 18 वर्षे वयोगटातील जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांचे दि. 17 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत संपूर्ण शहरभर सर्व्हेक्षण केले जाणार आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दि. 1 एप्रिल 2010 रोजी कार्यान्वित झाला आहे. या कायद्यांतर्गंत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला अहे. अद्याप बरीच मुले शिक्षणापासून वंचित रहात असलेचे दिसून येते. या वंचीत मुलांना शिक्षण विभागाकडून दाखल करण्याचे वेळोवेळी प्रयत्न होत आहेत.
महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हयातून मोठया प्रमाणात कुटूंबे स्थलांतरीत होत असतात. यामध्ये ऊसतोड कामगार, दगड खाणीत काम करणारे, वीटभट्टीवरील कामगार व बांधकाम क्षेत्रातील कामगार वर्ग कुटूंबासहित स्थलांतरीत होत असतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात व आजही अनेक बालके विविध कारणांमुळे शाळाबाहय आढळून येतात. या स्थलांतरीत बालकांना येणा-या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शासनाचे विविध विभागांमध्ये समन्वय ठेऊन शाळाबाहय व स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्व्हेक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व अन्य विभागातील कर्मचारी यांचे माध्यमातून केले जाणार आहे. यामध्ये सर्वेक्षण संपूर्ण प्रभागात, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, वीटभट्टया, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटूंबे, साखर कारखाने इत्यादी ठिकाणीही करुन शाळाबाहय मुलांचा शोध घेतला जाणार आहे. यानंतर जी मुले जिथे आढळतील त्या परिसरातील शाळेत त्यांना दाखल करण्यात येणार आहे.