no images were found
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आली समोर
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि भाजपचे आमदार आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत.
अजित पवार हे महायुतीसोबत आल्यानं त्यांच्यासह 9 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.
मात्र रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक नंदनवन या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांना त्या -त्या खात्याची माहिती असावी यासाठी आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, येत्या 9 किंवा 10 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणार नसल्याचं समोर आलं आहे.