no images were found
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोहीम राबवणार – चारुदत्त पिंगळे
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात 131 मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यांतूनही ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याची मागणी आली आहे. त्यानुसार त्या त्या राज्यांत महासंघ स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच त्याद्वारे 1000 हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच ‘दी केरल स्टोरी’ या चित्रपटानंतर देशभरात लव्ह जिहादची भीषणता दर्शवणारी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशा वेळी हिंदू मुली आणि पालक यांच्यात अधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याने लव्ह जिहादच्या विरोधात वर्षभर मोहीम राबवली जाणार आहे. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदुहिताच्या उपक्रमांना गती देण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर हिंदु संघटनांचे एकत्रीकरण करून देशभरात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समित्या’ स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या समारोपीय पत्रकार परिषदेत दिली.
फोंडा, गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे पू. चित्तरंजन स्वामी महाराज, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव श्री. जयेश थळी, ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि हरियाणा येथील ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री उपस्थित होते.