no images were found
पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर कारचा अपघात; चौघांनी जीव गमावला तर ४ जण जखमी
नाशिक: शिर्डी ते भरवीर हा सुमारे ८० किलोमीटर समृद्धी मार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे.
हज यात्रेसाठी नातेवाईकांना मुंबईला सोडून घरी परत जाताना कारला अपघात होऊन चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.
अपघातात रज्जाक अहमद शेख (५५), सत्तार शेख लाल शेख (६५), सुलताना सत्तार शेख (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख (४०) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर जुबेर रज्जाक शेख (३५), मैरूनिसा रज्जाक शेख (४५), अझर बालन शेख (२५), मुस्कान अजर शेख (२२) हे गंभीर जखमी झाले असून सिन्नर येथे प्राथमिक उचारानंतर जखमींना तातडीने शिर्डी येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले आहेत.
समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्यातील सिन्नर तालुक्यात घोटी शिर्डी समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारला हा अपघात झाला. मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. संरक्षक भिंतीला आदळून हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.
मध्यरात्री बाराच्या सुमारास महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर किमी ५५५.८ येथे सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी इनोव्हा कार (क्रमांक MH-19 Y- 6074) हिचेवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात झाला. मात्र, या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.