no images were found
जागतिक तंबाखू विरोधी दिन
आज आहे वर्ल्ड नो टोबॅको दिवस ज्याला आपण मराठीत जागतिक तंबाखू विरोधी दिन असही म्हणू शकतो. तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कर्करोग हा त्यातीलच एक आजार. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे, त्याचे व्यसन सोडा हा संदेश देणारा आजचा विशेष दिन म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे! पण तुम्हालाही कधी न कधी प्रश्न पडला असेल की हा दिवस सुरु करण्यामागची पार्श्वभूमी काय? किंवा 31 मे ला हा दिन का साजरा केला जातो? तर मंडळी, आज त्याचंच उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि सोबत या दिनाचे अन्य महत्त्व विशेष सुद्धा कथन करणार आहोत. तुम्ही सुद्धा ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवून समाजात
जनजागृती करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना, मित्रमंडळींना ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे, त्यांना हे व्यसन सोडण्यास भाग पाडा.
31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हा की जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी 1987 साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने 1988
सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी वर्ल्ड नो टोबॅको डेपाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरवण्यात आला, परंतु काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि 31 मे हा दिन निश्चित करण्यात आला.
म्हणून 1988 सालापासून दर 31 मे रोजी वर्ल्ड नो टोबॅको डे पाळण्यात येतो. आपल्या देशात तंबाखू सेवन हे अधिक करुन धुम्रपानातून होतं आणि तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरंय की जो व्यक्ती धुम्रपान करतो त्याला तंबाखूचे दुष्परिणाम तर भोगावे लागतातच, पण त्याच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातही तो तंबाखूजन्य धूर जाऊन त्या निष्पाप व्यक्तीला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. याचा अर्थ असा की तुम्ही धुम्रपान न करुन सुद्धा तुम्ही नकळत धुम्रपान करत आहात.
डॉक्टरांच्या मते तंबाखूच्या धुरामध्ये 7 हजार केमिकल्स असतात ज्यापैकी 50 केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कोणा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर हे केमिकल्स तुमच्या शरीरातही प्रवेश करतात. आणि जास्त वेळ राहतात. तुम्ही अनेकदा ऐकलं
असेल की एखादा व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने मेला पण त्याने कधीच व्यसन केलं नव्हतं, तर मंडळी त्याचा जीव याच पद्धतीने गेलेला असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांपासून दूरच रहावे.
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यूमुखी पडतात, असे निर्दशनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुप्फुसाचे आजार, टीबी यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, नपुसंकत्व, मोतीबिंदू, कमी वजनाचे व्यंग असलेले मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडल्याचे प्रमाणही वाढते. देशात बिडी, गुटखा, सिगारेट, मावा, खेनी मिसरी चिलीम यासारख्या तंबाखूच्या पदार्थाचे व्यसन मोठया प्रमाणात केले जाते.
आता तुम्ही म्हणाल की यापासून मी कसा वाचू किंवा स्वतः चा कसा बचाव करु? तर मंडळी जर तुम्ही शहरात राहत असाल तर अशा धुम्रपानापासून तुम्ही जास्त काळ स्वत:चा बचाव करू शकत नाही. कारण शहरात ठिकठिकाणी सिगारेट ओढत लोक फिरत असतात. यावर उपाय एकच तो
म्हणजे जनजागृती होणे आणि लोकांनी स्वतःहून धुम्रपानाचे व्यसन सोडणे या गोष्टीसाठीच 31 मे हा खास दिवस आहे. पण फक्त याच दिवशी जनजागृती करावी असं नाही. ही जनजागृती वर्षातीन ३६५ दिवस झाली तरच फरक पडेल. 31 मे हा दिवस फक्त लोकांना आठवण करुन देण्यासाठी
आहे की आपण अजूनही तंबाखूजन्य पदार्थापासून मुक्त झालेलो नाही. आपली लढाई अजून बाकी आहे. मंडळी तुम्ही सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून या लढाईत सहभाग दर्शवला पाहिजे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा, अनोळखी माणसांना तुम्ही समजावू शकत नसलात तरी ओळखीच्या माणसांना तुम्ही नक्कीच समजावू शकता. चला तर आजपासून आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेऊया.. आणि तंबाखूला कायमचं हद्दपार करुया…