no images were found
रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांची कोल्हापूर रेशीम प्रकल्पास भेट
कोल्हापूर : नागपूर रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी जिल्ह्यातील रेशीम उद्योगाची पाहणी करुन शेतकऱ्यांना रेशीम शेतीतील संगोपन व उत्पादनातून शाश्वत उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले.
राधानगरी तालुक्यातील प्रयत्नशील शेतकरी दिपक शेट्टी यांच्या २ एकर रेशीम शेतीस श्री. ढवळे यांनी भेट दिली. तुतीच्या बागेची जोपासनाकरिता आवश्यक माहिती देवून किटक संगोपनगृहाची पाहणी केली. शेडमधील हवा बाहेर काढण्यासाठी एक्सॉस्ट फॅन बसविण्याच्या सूचना दिल्या. रेशीम अळ्याची पाहणी करुन तापमान व आर्द्रता कशी मेंटेन करावी याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच शाहुवाडी तालुक्यातील वारुळ या गावी भेट देवून येथील ज्योती ठोंबके यांच्या ६ एकर जागेत उभारलेल्या तुती बागेस व किटक संगोपनास भेट दिली. यावेळी श्रीमती ठोंबके यांनी दुध व्यवसाय, ऊस व्यवसाय, कोळी व्यवसाय यामध्ये कष्ट व मजूरांची आवश्यकता आहे. भांडवल जास्त घालुन जास्त दिवसांची उत्पादन मिळते. उत्पादित मालाला दर मिळत नाही म्हणुन, शाश्वत उत्पादन देणारी कमी खर्चात व कमी कालावधीमध्ये उत्पादन देणारा व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे वळल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील या आदर्श रेशीम कार्याला भेट दिल्याबद्दल श्री. ढवळे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यामध्ये आदर्श रेशीम प्रकल्प उभारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाहुवाडी परिसरामध्ये किमान १ एकर शेतावर तुतीची लागवड व्हावी व शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून शाश्वत उत्पादन मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी रेशीम विकास अधिकारी डॉ. खंडागळे, श्री.संकपाळ, श्री. कांबळे उपस्थित होते.