no images were found
‘शासन आपल्या दारी; अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या -जिल्हाधिकारी
कोल्हापूर :- राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविले जात आहे. सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून आपल्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना 15 जूनपर्यंत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली "शासन आपल्या दारी ; अभियानांतर्गत विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.रेखावार म्हणाले, प्रत्येक विभागाने त्यांना देण्यात आलेल्या विहित नमुन्यात आपल्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच या अभियानांतर्गत लाभ देण्यात येणार असलेल्या लाभार्थ्यांची संख्या याची दैनंदिन आकडेवारी तात्काळ भरुन सादर करावी.
प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.
या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी सर्व विभाग प्रमुखांनी यापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा., असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी निर्देशित केले.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, बचतगटांतील सर्व महिलांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी करुन घेऊन सर्व कुटुंबे विमा सुरक्षित करावीत. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्या कुटुंबांना देखील या विमा योजनेत सहभागी करुन घ्यावे. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी या अभियाना अंतर्गत विभाग निहाय उद्दिष्ट सांगितले.