no images were found
उद्योजकांना आता काळानुसार बदलावे लागेल : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
मुंबई : सध्याची तरुण पिढी डिजीटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करु लागली आहे. नवी सॉफ्टवेअर, ॲप्स वापरण्याचे प्रमाण तसेच लॅपटॉप व मोबाईलवरुन व्यवहार वाढले आहेत. रस्त्यावरील फेरीवाले आणि छोट्या विक्रेत्यांकडेही आता डिजीटल पेमेंटची सोय उपलब्ध आहे. विपणन व प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. आजचा ग्राहकवर्ग अधिक जागरुक व ऑनलाईन इत्थंभूत माहिती घेऊन मगच उत्पादने खरेदी करतो. उद्योजकांना आता काळानुसार बदलावे लागेल व व्यवसायात नवी तंत्रे, नवे प्रवाह व नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी डोंबिवली येथे केले.
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारातर्फे आयोजित केला जाणारा आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा यंदा धनंजय दातार यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत ज्येष्ठ चित्रपट कलावंत शिवाजी साटम उपस्थित होते. राहणार आहेत. श्री. दातार व श्री. साटम यांच्या हस्ते विवीध क्षेत्रांत स्पृहणीय कामगिरी करणाऱ्या ५० गुणवंत डोंबिवलीकर नागरिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर ‘डोंबिवलीकर’ मासिकाचे संपादक रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही पाहुण्यांशी संवाद साधला.
धनंजय दातार पुढे म्हणाले, की उद्योग सुरू करणे मुळीच अवघड नाही फक्त त्यात टिकून राहण्याची जिद्द आणि मी हे करुन दाखवीनच, अशी चीड मनात पाहिजे. व्यवसायाला देशाच्या सीमा राहिल्या नाहीत. तुम्ही परदेशातही जाऊन यशस्वी होऊ शकता. आखाती देशांमध्ये केरळी समुदाय, कॅनडात पंजाबी समुदाय आणि सिंगापूरमध्ये तमीळ समुदाय ही काही ठळक उदाहरणे आहेत. त्यांनी तेथे दीर्घ वास्तव्य करुन मेहनतीने आपले उद्योग नावारुपाला आणले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनीही आपल्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घेत अनेक रंजक किस्से सांगितले आणि उपस्थितांच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. लहान वयात रंगमंचावर प्रथम उभे राहिल्यावर मी संवाद विसरुन गेलो होतो मात्र पुढील काळात अभिनयक्षेत्रात मी समोर येईल ती भूमिका मेहनतीने निभावत गेलो, असे त्यांनी नमूद केले.
डोंबिवलीच्या विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या डोंबिवलीकरांचा परिचय करुन देण्यासाठी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारतर्फे यंदा ‘झळाळती शंभरी’ हा विशेषांक तयार केला असून तो डॉ. दातार व श्री. साटम यांच्या हस्ते सोहळ्यात प्रसिद्ध करण्यात आला.
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या सांस्कृतिक चळवळीचे हे १५ वे वर्ष आहे. त्याअंतर्गत डोंबिवलीकर मासिकाबरोबरच डोंबिवलीकर दिनदर्शिका व आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात. सामाजिक, साहित्य, कला, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, निसर्ग, पर्यावरण आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकरांना आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या १४ वर्षांत किमान ७५०० हून अधिक गुणवंत डोंबिवलीकरांचा परिचय या सोहळ्याच्या माध्यमातून घडवण्यात आला आहे.