no images were found
मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदर आदेशान्वये, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत सर्व मतमोजणी केंद्रांच्या परिसरामध्ये पुढील नमूद कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतमोजणीदिवशी मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी, पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधींव्यतिरिक्त अन्य व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल, अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे, चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करण्यास या आदेशानुसार मनाई आहे. मतमोजणी ठिकाणांच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोटारगाड्या, वाहनांचा वापर करण्यास तसेच वाहन थांबविण्यास मनाई आहे. (निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून) तसेच, परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीला मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य वापरणे, (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून) मतमोजणी ठिकाणी उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल, अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने (शस्त्र अधिनियम 1959 व नियम 2016 मधील तरतुदी प्रमाणे) कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नीशस्त्रे व दारुगोळा इ. ची वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करण्यास मनाई (सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून.) असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 233 प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे.