
no images were found
साकीनाका मध्ये दुकानाला भीषण आग; २ कामगारांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील घाटकोपर अंधेरी लिंकरोडवर साकीनाका मेट्रो स्थानकाला लागून असलेल्या राजश्री हार्डवेअरला आज मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागली तेव्हा दुकानात एकूण ११ कामगार झोपलेले होते. यातील नऊ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास साकीनामा मेट्रो स्थानकाच्या शेजारीच असलेल्या राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर या दुकानाला अचानक आग लागली. दुकानातून आगीचे लोळ उठलेले पाहून स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या व दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्या. दुकानात असलेल्या एकूण ११ कामगारांपैकी दोन जण आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राकेश गुप्ता (वय २२) आणि गणेश देवासी (वय २३) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
आग दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि साधारण साडेतीन वाजताच्या सुमारास आग विझवण्यात यश आलं. मात्र तासाभरानंतर ही आग पुन्हा भडकली. त्यानंतर पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. दरम्यान, वायर आणि प्लास्टीक सारखे ज्वलनशील वस्तू आत असल्याने आग प्रचंड भडकली. आगीत हे साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सध्या हे दुमजली बांधकाम जेसिबीच्या सहाय्याने तोडण्याचे काम सुरु आहे.