
no images were found
देशातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार ‘वंदे भारत’
पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे काश्मीरला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. बऱ्याचदा प्रवासात कधी हवामान तर कधी अतिरेकी अडसर ठरतात. परंतु भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरच्या प्रवासात आता कोणताही अडथळा येणार नाही हा पराक्रम करून दाखवला आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर या मार्गावरील चिनाब पुलावरूनही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी केली. जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या उपस्थितीत ट्रॅक माउंटेड व्हेइकल अर्थात रेल्वे ट्रॉली धावली. या निमित्ताने रेल्वेमंत्री यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रकल्प जानेवारी २०२४पर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर यावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी काश्मीर खोऱ्यातील बडगाम जिल्ह्यात देखभाल सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शहरांतर्गत प्रवास वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी वंदे भारत मेट्रोची बांधणी करण्यात येणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यानंतर वंदे भारत ट्रेनही जम्मू ते श्रीनगर अशी धावणार आहे. या प्रकल्पातील सर्वात कठीण काम म्हणजे चिनाब नदीवर रेल्वे पूल बांधणे चिनाब नदीवरील पुलाच्या निर्मितीचे मोठे अवघड काम रेल्वे अभियंत्यांनी पूर्ण केले आहे. पुलाची पाहणी करण्यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी पूजाही केली आणि ट्रॉलीत बसून पूल पार केला. तसेच प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीला विशेषत: काश्मिरी सफरचंद रेल्वेमार्गे देशाच्या कानाकोपऱ्यात कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे. बांधकाम साहित्य, जीवनावश्यक वस्तू काश्मीर खोऱ्यात आणण्यासाठी वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होते. यासाठी बनिहाल ते बारामुल्ला दरम्यान प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेंतर्गत चार कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. यापैकी दोन टर्मिनलसाठी जागा निश्चित करण्यात आली असून उर्वरित दोन टर्मिनलसाठी जागा लवकरच निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.