no images were found
गौतम अदणींवरील आरोपांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न…
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. यानंतर आता अमेरिकन सरकारने गौतम आदाणी यांच्यावरील झालेल्या आरोपांची आपल्याला माहिती असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेच्या वकिलांनी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकार्यांना २,०२९ कोटी रूपयांची लाच देऊ केली. या बदल्यात त्यांना पुढील २० वर्षांमध्ये २ अब्ज डॉलर्स नफा मिळणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही लाच दिल्याचे नाकारत अदाणी समुहाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप याबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही.
दरम्यान व्हाइट हाऊस सेक्रेटरी करीन जीन-पिअर यांनी गुरूवारी अदाणी समुहाविरोधात होत आलेल्या आरोपांची प्रशासनाला माहिती असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी अमेरिका आणि भारत या दोन देशांमधील संबंध मजबूत आधारावर उभे असल्याचेही यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की, “अर्थांतच आम्हाला या आरोपांबद्दल माहिती आहे आणि अदाणी समूहाविरूद्ध करण्यात आलेल्या आरोपांबद्दल सविस्तर तपशीलांसाठी तुम्हाला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांच्याकडे जावे लागेल”.
“भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांविषयी बोलायचे झाल्यास, आम्हाला विश्वास आहे की दोन्ही देशांचे नाते हे नागरिकांमधील संबंध आणि असंख्य जागतिक विषयांमध्ये असलेले सहकार्य याच्या अत्यंत मजबूत पायावर उभे आहेत”, असेही ते म्हणाले.
“आम्ही विश्वास बाळगतो आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की, आम्ही या प्रकरणातून मार्ग काढू. यासंबंधी सविस्तर माहिती ही एसईसी आणि डीओजे देऊ शकतात, पण पु्न्हा स्पष्ट करतो की, आम्हाला विश्वास आहे की या दोन देशामधील नाते हे एका भक्कम पायावर उभे आहे”, असेही व्हाइट हाऊस प्रेस सेक्रेटरी म्हणाले.
अदाणी समुदायाचे संस्थापक गौतम अदाणी यांनी २५० दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. अदाणी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”.
“अमेरिकेच्या विधी विभागानेच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींची विचार करत आहोत”, असेही अदाणी समूहाकडून सांगण्यात आलं आहे.
तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदाणी यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदाणींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत. पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदाणींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला आहे. देश त्यांच्या मुठीत आहे. देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागीदारी आहे. एका बाजूने अदाणी आणि दुसर्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. मोदी व भाजपा त्यांच्या पापात सहभागी आहेत. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. मुळात मोदींमध्ये तेवढी हिंमत व क्षमता नाही. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरूंगात जाऊ शकतात”.भाजपने मात्र राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध केला आहे. तसेच अमेरिकेच्या न्यायालयात नावे घेण्यात आलेल्या चार राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपाचे सरकार नसल्याचे नमूद केले आहे.