no images were found
कंत्राटी कामांची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास कळवावी
कोल्हापूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील शासन निर्णयानुसार आपल्या विभागात किंवा आपल्या अधिनस्त कार्यालयामध्ये असलेल्या कामाची यादी तयार करुन ती कामे बेरोजगार युवक युवतींच्या सहकारी सेवा संस्थांमार्फत करुन घेण्याची कार्यवाही विधानसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता संपताच नियमीतपणे करावी. तसेच १० लाख रुपयांपर्यंतच्या कंत्राटी कामांची माहिती सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय निवासस्थान, सी बिल्डींग, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर अगर kolhapurrojgar@gmail.com या ईमेलवर कळवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील शासन निर्णयानुसार राज्यातील बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना लोकसेवा केंद्रांना स्वावलंबी होण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतची कामे विना निविदा देण्याबाबत शासन निर्णय निर्गमीत झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कामवाटप समिती गठीत करण्यात आली असून कामवाटप रक्कमेची मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ३ लाख रूपये करण्यात आली होती. दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ च्या शासन निर्णयानुसार ही मर्यादा रक्कम रुपये १० लाख करण्यात आली आहे.
बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना स्वबळावर कार्यरत होण्यासाठी शासनाच्या विविध विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेली दैनंदिन व्यवहाराची कामे बेरोजगार युवक युवतींच्या सहकारी सेवा संस्थांमार्फत करुन घेण्याची कार्यवाही करण्याबाबत कामवाटप समितीच्या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सूचीत केले आहे.
सन २००१ पासून शासनाने सहकारी सेवा संस्था अधिनियमाखाली बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यामध्ये २८० सेवा संस्था स्थापन झाल्या असून त्यापैकी ५१ सेवा सोसायट्या कार्यरत आहेत. बेरोजगारांच्या सेवा संस्थांना शासनाने यापूर्वी विना अनुदान मदत केलेली आहे, या सहकारी संस्थांना यशस्वी होण्यासाठी भरीव प्रकारची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेतले आहेत.