no images were found
शिंदे-फडणवीस सरकारला धोका आहे काय?; विधानसभा अध्यक्षांच मोठं वक्तव्य!
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. या सुनावणीचा निकाल पुढील आठवड्याभरात लागेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या आहेत. या निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार? अशी चर्चाही रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या भवितव्याच्या अनुषंगाने त्यांनी हे विधान केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही. या सरकारला कोणताही धोका नाही, असा निर्वाळाच राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. महाराष्ट्रात किंवा देशात कोणतंही सरकार बहुमताच्या आधारावर सत्तेत असतं. मी विधानसभेचा अध्यक्ष झाल्यावर शिंदे-फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. आकडे माझ्यासमोर आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कोणताही निर्णय आला तरी हे सरकार अस्थिर नाही. या सरकारला धोका नाही, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. तेच उत्तर देतील
नरहरी झिरवाळ यांनी वक्तव्य केले होते की, माझ्याकडे प्रकरण आल्यास मी 16 आमदारांना अपात्र ठरवेल. या संदर्भात बोलताना नार्वेकर म्हणाले की, “संविधानात ज्या तरतुदी आहेत आणि विधानसभेचे जे नियम आहेत, त्या अनुषंगाने मी आपल्याला ठामपणे सांगू शकतो की, आपल्या संविधानातातील तरतुदीनुसार ज्या-ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचे कार्यालय रिक्त असते, त्यावेळी त्या कार्यालयाचे अधिकार उपाध्यक्षांकडे असतात आणि ज्या क्षणी अध्यक्ष कार्यालयात उपस्थित असतात किंवा चार्ज घेतात त्या क्षणापासून उपाध्यक्षांकडे दिलेला चार्ज संपुष्टात येतो आणि त्यांच्याकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार राहत नाहीत.” असं राहुल नार्वेकर म्हणाले.