no images were found
विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे: मंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर,: आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब करून शालेय शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष अॅप विकसित करून शालेय शिक्षण क्षेत्राला महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यापीठे आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित काम केल्यास अधिकाधिक शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना उपक्रमांतर्गत ही प्रणाली विकसित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाला अर्थसाह्य केले आहे.
शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेली आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील विदर्भासह सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मनोदय जाहीर करून मंत्री केसरकर म्हणाले, भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे, असे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व शैक्षणिक व्यवस्थांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आजघडीला शालेय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण यांच्यामधील सीमारेषा पुसल्या जाणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांना घडवित असताना वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे, पादत्राणे वगैरे बाबी पुरवितो, मात्र त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता ही उत्तम मार्गदर्शनातूनच येईल. त्यासाठी भाषा, विज्ञान व गणित या विषयांमध्ये त्याला रुची निर्माण व्हावी, या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेल्या या आधुनिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक संकल्पना अधिक सुस्पष्ट होऊन त्यांना त्यात रुची निर्माण होईल. त्यातून केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्येही ते यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.