
no images were found
ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील मॉलच्या इमारतीला भीषण आग; काहीजण अडकल्याची भीती
ठाणे: शहरातील घोडबंदर रोडवरील एका मॉलमध्ये संध्याकाळी भीषण आग लागली. घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत आहेत. यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सिनेवंडर मॉल तसेच ओरियन पार्क या दोन्ही मॉलमध्ये भीषण आग
ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ही आग लागली. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. रात्री 8.30 च्या सुमारास लागलेली ही आग जवळपासच्या व्यावसायिक इमारतींमध्येही पसरली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथे सर्व्हिस रोडवर असलेल्या सिनेवंडर मॉल तसेच ओरियन पार्क या दोन्ही मॉलमध्ये रात्री अचानक आग लागली. या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आग लागल्याने बाजूलाच असलेल्या सिनेवंडर मध्येही आग पसरली. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली. आगीची माहिती कळताच मॉल रिकामा करण्यात आला. ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याने काहीजण त्यात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होते. दरम्यान या आगीमुळे कोणालाही जीवितहानी झाली नाही आणि कोणालाही दुखापत झाली नसल्याचे ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगीतले. ठाण्यातील या इमारतीला लागलेली आग प्रचंड भीषण आहे. आगीचे लोळ लगतच्या रस्त्यांवर येऊ लागले. त्याच्या परिणामी घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.