no images were found
संजय राऊत म्हणतात, लवकरच स्फोट होणार, शिंदेंच्या मंत्र्याचा कोट्यवधींचा घोटाळा
सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची एकूण १७ प्रकरणं माझ्याकडे आहेत, असा दावा संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता संजय राऊत यांनी ट्विट करत शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांना लक्ष्य केलं आहे. राऊत यांनी दादा भुसेंवर गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल रात्री साडेनऊच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो नावाने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आणि याचे पडसाद आता विधिमंडळात उमटण्याची चिन्ह आहेत. ‘हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल’, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ईडी आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.
संजय राऊत यांच्या ट्विटनंतर दादा भुसे यांच्यासंदर्भातील गिरणा अॅग्रो कंपनीवरून जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांने दादा भुसे यांच्यावर उघड टीका करायला सुरुवात केली आहे. मालेगावात चर्चांना उधाण. कधीकाळी मालेगावचे वैभव असलेल्या गिरणा सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी अवसायनात निघालेला हा साखर कारखाना वाचवण्यासाठी गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून शेअर्सच्या स्वरुपात तालुक्यातील शेतक-यांकडून रक्कम गोळा करण्यात आली होती. त्यावेळी विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला होता. आता या प्रश्नांवरून संजय राऊत यांनी भुसे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी जमा केलेल्या रकमेत पालकमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.