no images were found
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु , कधीपर्यंत पूर्ण होणार?
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांदा ते राजापूर या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झालं असून रत्नागिरत परशुराम घाट रस्ता व डोंगराळ भागातील कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत महत्त्वाची माहिती विधान परिषदेत दिलीय. या महामार्गावर ८४ किमी रस्त्याचे चौपदीरकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असेल. यातील एका मार्गिकेचं काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. तर दुसऱ्या मार्गिकेचं कामही लवकर पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
महामार्गाच्या कामाला येत्या गुरुवारपासून वेगाने सुरूवात करण्यात येईल. या कामाचे कंत्राट दोन ठेकेदारांना देण्यात आलं असून सकाळ ते संध्याकाळ १० ड्रोनच्या माध्यमातून या कामावर लक्षही ठेवलं जाईल असंही रवींद्र चव्हाण म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा ते राजापूर या रस्त्याचं चौपदरीकरण झालं आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाट रस्ता आणि डोंगराळ भागातली कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. ‘पनवेल ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी आल्या होत्या. या अडचणीवर मार्ग काढण्यात आला आहे. या रस्त्यासाठी १०० टक्के भूसंपादन झाले. भूसंपादनाचे पूर्ण पैसे राज्य सरकारकडे जमा आहेत. रस्त्याच्या कामी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईबाबत काही कुटुंबांमधील अंतर्गत मतभेद संपुष्टात आल्यानंतर भरपाईची रक्कम संबंधितांना वाटप करण्यात येईल’, असे चव्हाण यांनी सांगितले.