no images were found
हुबळीत हस्तिदंताचे दागिने विकणार्या पाच जणांना अटक
निपाणी : हुबळीत हस्तिदंतापासून बनवलेले दागिने विकणार्या पाच जणांच्या टोळीला वन विभागाच्या सीआयडी पथकाने पकडले. त्या टोळीत कोल्हापुरातील तिघांचा तर निपाणीतील दोघांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या तिघांमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचाही समावेश आहे. त्या टोळीकडून हस्तिदंती दागिने जप्त करण्यात आले आहेत.
हुबळी बसस्थानकावर गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. साथ शहाजान जमादार (वय २३, रा. उचगाव कोल्हापूर), सागर सुभाष पराणिक (४२, रा. शुक्रवार पेठ कोल्हापूर), विजय राजाराम कुंभार (३५ रा. हरळी, ता. गडहिंग्लज), विनायक नामदेव कांबळे (३० रा. भीमनगर निपाणी) व धनाजी पांडुरंग पाटील (रा. आप्पाचीवाडी ता. निपाणी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
डीएसपी सरवगोळ यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हुबळी बसस्थानकावर काल सकाळी सापळा रचला. संशयित हे पाच जण आपल्या सोबत हस्तिदंतापासून तयार केलेली आभूषणे विक्रीसाठी घेऊन हुबळी बस स्थानकावर उतरले होते. डीएसपी मुत्ताणा सरवगोळ यांनी वेशांतर करून त्यांच्याकडे खरेदीचे नाट्य रचले. त्यात संशयित अडकले. त्यांच्याकडे 1125 ग्रॅम वजनाची आभूषणे तसेच नक्षीदार खडे, दागिने ठेवण्यासाठीची पेटी अशा प्रकारच्या वस्तू आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अटकेतील साथ जमादार हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून सध्या तो बी.कॉम.च्या तृतीय वर्षामध्ये शिकत आहे. विजय कुंभार हा व्यापारी तर सागर पराणिक हा शेतमजूर तर धनाजी व विनायक हे मजुरी करतात. या पाच जणांनी एकत्रित येऊन हा व्यवसाय चालवला होता.