no images were found
ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन
ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरेंनी नाट्यगृहातच घेतला अखेरचा श्वास
अमरावती : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे अमरावती येथे काल रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. राजाभाऊ मोरे यांना नाट्य परिषदेच्या वतीने यंदा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य नाटकासाठी वेचले. ३३ वर्षांपूर्वी राजाभाऊंनी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली होती. ग्रामीण भागात तसेच सामान्य लोकांपर्यंत नाटक पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अमरावती शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे गुरुवारी रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी आयुष्यभर नाट्य रंगभुमीची सेवा केली. त्यांची अखेरही त्याच रंगभुमीसमोर झाली. नाटक पाहत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यामध्ये त्यांना मृत्यू ओढवला.
अमरावती येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील ‘थँक यु मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू असताना राजाभाऊ मोरे प्रेक्षकगृहात बसून नाटक पाहत होते अन नेमके त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ रंगकर्मीची अखेर अशापद्धतीने नाट्यगृहातच झाल्याने अमरावतीकर हळहळले. आज त्यांच्यावर अमरावतीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.