no images were found
पोलिस आयुक्तांनी साधला थेट रिक्षा, व्हॅनचालक, शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद
औरंगाबाद : शाळा व महाविद्यालयामधील आतील परिस्थिती तुम्ही सांभाळा, ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नका, परिसरात सीसीटीव्ही बसवा, सुरक्षारक्षकांची नेमणूक करा, कॅम्पसच्या बाहेरची परिस्थिती आम्ही हाताळतो, अशा सूचना सर्वांशी थेट संपर्क साधत पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शाळा, महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकांना यांना केल्या.
सिडकोतील एका शाळकरी मुलीशी रिक्षाचालक, व्हॅनचालकाकडून अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरला स्वतः पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता थेट रस्त्यावर आले व त्यांनी विविध शाळा, महाविद्यालये आणि परिसरात शाळा सुटण्याच्या वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन सूचना केल्या.
दरम्यान आयुक्तांनी रिक्षा, व्हॅनचालक, शिक्षक, विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. गुप्ता यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शाळेत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत का?, विद्यार्थ्याला ओळखपत्र दिले का? सुरक्षारक्षक नेमले का?, शाळेच्या आवारात टवाळखोर मुले फिरतात का?, रिक्षा व व्हॅनचालकांचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता शाळेने घेतलेला आहे का?, मुलींच्या तक्रारी कशापद्धतीने सोडविल्या जातात? दामिनी पथक आणि संबंधित पोलिस ठाण्याचे व पोलिस अधिकाऱ्यांचे नंबर घेतलेले आहे का? याबद्दलची चौकशी केली.
तसेच मार्गातील टवाळखोर मुलांनाही ताब्यात घेतले. पोलिस आयुक्तांनी मुलींशी संवाद साधला. तुम्हाला कोणी त्रास देते का? रिक्षा व व्हॅनचालकांकडून त्रास होतो का? अशी विचारणा केली. काही मुलींनी टवाळखोर मुले वाहनांवर बसून मुलींकडे पाहून कमेंट करीत असल्याची तक्रार केली. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर मात्र टवाळखोर मुले आपल्या वाहनांवर बसून जोरजोरात बोलतात, हसतात, मुलींकडे पाहून विचित्र हावभाव करतात अशी तक्रार शिक्षकांनी केली. सरस्वती महाविद्यालयाच्या रस्त्यालगत असलेल्या वडापाव दुकानात पोलिस आयुक्त स्वतः गेले व त्यांनी दुकानदाराला टवाळखोर पोरांना बसू देऊ नकोस, पायऱ्यावर मुले बसलेली असतात अशी तक्रार असल्याचे सांगताच दुकानदाराने पायऱ्या काढून टाकल्या असून मुले बसू नये म्हणून ऑइल टाकले असल्याचे सांगितले. गुप्ता यांनी त्याचीही पाहणी केली. नंतर चिकलठाणा येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालय शाळेमध्येही ते गेले. तेथील परिसराची पाहणी करीत ओळखपत्र नसलेल्या मुलांना हटकून सर्व परिसराची पाहणी केली.