
no images were found
जालन्यातील उत्तर प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे महाराष्ट्रात खळबळ
जालना : उत्तर प्राप्तिकर विभागाने जालना येथे केलेल्या कारवाईत तब्बल 58 कोटींची रोकड, 16 कोटींचे सोने आणि तब्बल 390 कोटींच्या मालमत्तेचे घबाड प्राप्तिकरने केलेल्या छाप्यात हाती आले आहे. गेल्या 8 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे ही कारवाई सुरु होती.
कारवाई झालेले कारखाने /व्यावसायिक – जालन्यातील एसआरजे स्टील, कालिका स्टी आणि फायनान्सर विमल राज बोरा, प्रदीप बोरा यांच्यावर हे छापे टाकले. या कारवाईत तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली. यात सुमारे 58 कोटींची रोकड, 32 किलो सोने, हिरे आणि इतर ऐवजांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत कमालीची गुप्तता बाळगली. 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान रात्रंदिवस हे छापासत्र सुरू होते. त्यात नाशिक विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 400 अधिकारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून जालन्यात धडकले होते.
कोट्यवधींचा महसूल बुडाला : प्राप्तिकर विभागाच्या नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील 4 बड्या स्टील कारखानदारांनी आपल्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले. पण ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले. याद्वारे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा संशय होता. त्यामुळे नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास स्टील कारखानदारांवर व्यावसायिकांच्या कार्यालयांसह निवासस्थानावर छापे टाकले.
एकाच वेळी छापे : एकाच वेळी वेगवेगळ्या 5 पथकांनी ही कारवाई केली. सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील 8 ते 10 किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.
कागदपत्रे केली जप्त : जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, विटा, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यासह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला. मिळालेली रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली. सकाळी 11 ते रात्री 1 वाजेपर्यंत मोजणी पूर्ण झाली. त्यासाठी 10 ते 12 यंत्रे लागली. 35 कापडी पिशव्यांत नोटांची बंडले पॅक केली.