no images were found
‘खेळ आयुष्यातील अपयश पचवायला शिकवतात’ – गिरिजा देसाई-पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित न्यू पॉलिटेक्निक, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘न्यूक्लियस २०२४’ या वार्षिक क्रिडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या एशियन शूटींग चॅम्पियनशिप पदकविजेत्या असून सद्ध्या विभागीय वन अधिकारी आहेत. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
त्या पुढे म्हणाल्या, मोबाईलच्या अतिवापराने मुलांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतेचा क्षय होत आहे. त्यामुळे मुला-मुलींनी रोज एकदोन तास आपल्या आवडीच्या खेळाचा सराव करावा. त्याचबरोबर युपीएससी एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. खेळाडुंना शासकीय अधिकारी होण्याची उत्तम संधी आहे. न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी खेळाडुंना खिलाडूवृत्तीने खेळत इतरांचे यश मोठ्या मनाने स्विकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. जी. पाटील यांनी सर्व संघांना शुभेच्छा देत संस्थेची खेळांमधील उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी संस्था खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
क्रिडामहोत्सव प्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी विद्यार्थी गेली महिनाभर खेळसरावात मग्न असल्याने त्यांचा रोजचा मोबाईल स्क्रीन टाईम दोन तासाने कमी झाल्याचे आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. उपस्थितांनी श्रीफळ वाढवून व हवेत फुगे सोडून क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी नयनरम्य आतषबाजी तसेच जनरल चॅम्पियनशिप ट्राॅफीचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक विनय पाटील, सविता पाटील, न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार, विभाग प्रमुख, सर्व स्टाफ, खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. युवराज गजगेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. महेश घोसाळकर यांनी आभार मानले. प्रा. दिपक पाटील यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली.