no images were found
वरुण गांधीं या यात्रेमध्ये चालू शकत नाहीत: राहुल गांधी
नवी दिल्लीः वरुण गांधींच्या एका प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, माझी आणि त्यांची विचारधारा जुळत नाही. ते भाजपमध्ये आहेत. ते या यात्रेमध्ये चालू शकत नाहीत आणि मी आरएसएस कार्यालयात जावू शकत नाही तसं करायचं असेल तर त्याआधी माझा गळा कापावा लागेल. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरुणची विचारधारा वेगळी आहे, ती मी कधीही स्वीकारु शकत नाही.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी भाजप आणि संघावर जोरदार हल्ला करीत आहेत. आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वरुण गांधी आणि संघाबद्दल राहुल गांधींनी रोखठोक मत मांडलं. भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीबद्दलही राहुल गांधींनी भाष्य केलं. ते पुढे म्हणाले की, मी कुटुंब म्हणून त्यांना प्रेमाने भेटू शकतो. गळाभेटही घेईल, परंतु विचारधारा कधीही स्वीकारणार नाही. राहुल गांधी पंजाबमधील होशियारपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधींनी सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीबद्दल खुलासा केला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची सुरक्षा भेदत एक व्यक्तीने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला होता. ते म्हणाले, की “सुरक्षेत कुठे चूक झाली? मला मिठी मारायला एक व्यक्ती येत असल्याचे मला दिसले होते. मात्र, यात कुठे चूक झाली हे मला कळत नाहीये. या यात्रेत खूप उत्साह असतो संबंधित व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपासले होते. गळाभेट घेणारी व्यक्ती उत्साहित झाली होती यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मला वाटत नाही. यात्रेत अशा प्रकारचे प्रसंग नियमित घडत असतात, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.