no images were found
नैसर्गिक मृत्यू झालेल्या ११ बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु.२ लाख ३४ हजार आर्थिक मदतीचे वितरण
कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशा परिस्थितीत सदर कुटुंबाला आधार देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन समाजातील सर्वच घटकांना धीर देण्याचे काम करीत असून, दुर्दैवी नैसर्गिक मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या पाठीशी कुटुंबांप्रमाणे राहणे हे शासनाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या मार्फत रु.२,३४,०००/- च्या आर्थिक मदतीचे शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आज प्राथमिक स्वरूपात वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नैसर्गिक मृत्यू झालेल्या ११ कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या मार्फत मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात अपघाती मृत्यूमुखी पडलेल्या ३ वारकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही यातून मदत करण्यात आली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रत्येक नागरिकांना बळ देण्याच काम सुरु आहे. शासन सर्वच घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांवर शासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. अशा घटनामध्ये शासन कुटुंबांप्रमाणे दुर्घटनाग्रस्तांच्या मागे उभे आहे. हे शासनाचे कर्तव्यच आहे. यामध्ये जठारवाडी येथील अपघाती घटनेतील रुग्णांचे संपूर्ण वैद्यकीय बिलही तात्काळ देण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले. अशा पद्धतीने लोकहिताच्या योजना राबविण्यात शासन प्रयत्नशील असून, नुकतीच बांधकाम कामगार कल्याण मंडळाची नोंदणीही नाममात्र एक रुपया इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा योजनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्त्वाखाली शासन राज्यास प्रगतीपथावर नेईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कामगार आयुक्त अनिल गुरव, माजी महापौर नंदकुमार वळंजू, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उप-जिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, तुकाराम साळोखे, उदय भोसले, शहर समन्वयक सुनील जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर आदी बांधकाम कामगारांचे कुटुंबीय उपस्थित होते.