no images were found
भाजपकडून दिग्गजांना, तर शिंदेंकडून ठाकरे मंत्रिमंडळातील नेत्यांना संधी
मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली असून त्यातील फक्त तानाजी सावंत हे एक नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात नवीन आहे. इतर सर्व हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. आज एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेतली.
पहिली मंत्रिपदाची शपथ राधाकृष्ण विखे पाटील यांची
भाजपकडून ९ दिग्गजांना संधी देण्यात आली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन, नंदुरबारमधील भाजप नेते विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
तर शिंदे गटाकडून पहिली शपथ ही आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
सांगलीतील मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाचे पैठण मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे, रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत, उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी शपथ घेतली.
त्यानंतर, डोंबिवलीमधील भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ शिंदे गटातील औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी शपथ घेतली. तर, शिंदे गटातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभुराज देसाई यांनीही शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली. हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री होणार असल्याची माहिती आहे.