no images were found
कागल मतदारसंघामधील मुश्रीफ समर्थकांमध्ये, मतदारांमध्ये संतापाचा कडेलोट
कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील दिन दलितांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दुसऱ्यांदा कारवाई केल्यानंतर कागल मतदारसंघामधील त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच मतदारांमध्ये संतापाचा कडेलोट झाला आहे. हे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
दरम्यान, या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यावर तोफ डागली आहे. चार दिवसापूर्वीच कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीमध्ये छापेमारी करण्यासाठी वाऱ्या केल्या होत्या असा आरोप मुश्रीफ यांनी केला. अशा पद्धतीने नाऊमेद करून गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर छापेमारी सुरू झाली झाल्याचे समजताच सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली. कागलमधील प्रत्येक चौकाचौकात कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
एका वृद्ध महिलेने दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. ती म्हातारी म्हणाली की, भाजपला पाडायचंय आणि मुश्रीफला निवडून आणायचंय. मी पेन्शन नेण्यासाठी आलो आहे. कागल मतदारसंघात मुश्रीफ आणि जनतेचे नाते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेक निराधारांना शासकीय लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुश्रीफांवर संकटे आली त्यावेळी त्यांचे पाठीराखे नेहमीच धावून आले आहेत.
पहिल्यांदा ईडीने कारवाई केली त्यावेळी सुद्धा कागलमधील महिलांनी विराट असा मोर्चा काढला होता. यानंतर आजही असाच प्रकार दिसून आला. अनेक समर्थक त्यांच्या निवासस्थानासमोर जमण्यास सुरुवात झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच कागल आणि कोल्हापूर बंदची हाक दिली. त्याचबरोबर काही समर्थकांनी मुंबईत सोमय्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला.